"सरकारबद्दल काही बोललं की ईडीची बिडी पेटल्याशिवाय राहत नाही", छगन भुजबळांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 08:51 AM2023-04-22T08:51:04+5:302023-04-22T08:51:39+5:30
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय शिबिर शुक्रवारी घाटकोपर येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते.
मुंबई : मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी मुंबईतील महत्वाची शासकीय कार्यालये, संस्था आणि उद्योगही बाहेर नेले जात आहेत. लाखो तरुणांचा रोजगार गेला, पण राज्य सरकार काहीही बोलायला तयार नाही. सरकारबद्दल बोललं की ईडीची बिडी पेटल्याशिवाय राहत नाही, अशी खोचक टीका छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर केली. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय शिबिर शुक्रवारी घाटकोपर येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते.
या शिबिरात उपस्थित कार्यकर्त्यांना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी "मुंबई महानगरपालिकेमधील सत्तेचे राजकारण, अर्थकारण, उदात्तीकरण-शासनाचा हस्तक्षेप" या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मुंबईतील वाढते काँक्रिटीकरण व प्रदूषणाच्या प्रश्नाकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, महापालिका निवडणुकीत लोकांसोबत लहानसहान गोष्टींमधून जोडले गेले पाहिजे. लोकांचे स्थानिक प्रश्न, रुग्णालयात भरती करणे, शाळांमधील प्रवेश, पोलिस त्रास देत असतील तर त्याकडे लक्ष द्यायला हवे. वॉटर, मीटर आणि गटार या प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे. राजकारणावर कितीही बोलले तरी जोपर्यंत तुम्ही लोकांशी जोडले जात नाही, तोपर्यंत निवडणुकीत अडचणी निर्माण होत राहतील, असे मत छगन भुजबळ यांनी मांडले.
मुंबईच्या प्रश्नावर बोलताना अठरापगड जातींना विसरता कामा नये. ओबीसी, एससी, एसटी या सर्वांना सोबत घेऊन पुढे जावे लागेल. पक्षाच्या कार्यालयापेक्षा लोकांमध्ये मिसळणे जास्त गरजेचे आहे. निवडणुका कधीही लागतील. अडचणी खूप येतील. तुम्ही जर मजबूत असाल तर यश तुमच्या पाठीमागे येईल. कोण आपल्याबरोबर आहे किंवा नाही हे महत्वाचे नाही. आपण आपल्या ताकदीवर उभे राहायला पाहिजे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण राहू शकतो. महापालिकेच्या निवडणुका घेण्याबाबत निर्णय होत नाही. प्रशासक नेमले आहेत. प्रशासक नेमल्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळतो. नगरसेवक प्रश्न विचारतात. पण आता स्थायी समिती, जनरल बॉडी तीच मग प्रश्न कोणाला विचारणार असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
यावेळी छगन भुजबळ यांनी शेरो-शायरीही केली. ते म्हणाले की, मेरें बारे कोई राय मत बनाना गालिब, एक दौर ऐसा भी आएगा मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी. तुम्हाला वाटेल ते बदलून दाखवून ही हिंमत असेल तर तुम्ही लढणार आहात. स्वतःच्या ताकदीवर निवडून येण्याची क्षमता असली पाहिजे. पण आपली मान दुसऱ्यांच्या खांद्यावर एकत्रित आपण आले पाहिजे. एका पक्षाचे राज्य येणे शक्य नाही. न घाबरता काम केले पाहिजे. लोकांच्या प्रश्नांवर बोलले पाहिजे. याचबरोबर, छगन भुजबळ यांनी खारघर दुर्घघटनेविषयी तीव्र शब्दांत राज्य सरकारला सुनावले. ते म्हणाले की, उन्हातान्हात निष्पाप लोकांचा बळी गेला. भारतरत्नसारखा पुरस्कारही दिल्लीच्या भवनात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दिला जातो. मग, महाराष्ट्र भूषणच्या या कार्यक्रमातून कोणाची ताकद दाखवायची होती. या सरकारला आपल्या पाठीमागे किती लोक आहेत, हे दिल्लीवाल्यांना दाखवायचं होतं का? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.