MNS Raj Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का? हा प्रश्न सर्वांच्या भावनिक जिव्हाळ्याचा होऊन बसला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज एका वेबिनारमध्ये हाच प्रश्न पुन्हा एकदा विचारण्यात आला असता त्यांनी अगदी दोनच शब्दांत मार्मिक उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का? असं विचारलं असता राज ठाकरे यांनी 'परमेश्वरास ठाऊक' अशा दोनच शब्दांत उत्तर दिलं. आत्ता सध्याचा काळ पाहता या प्रश्नांची उत्तरं नाहीत. इतर कुणाकडेही असतील असं वाटत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
परमेश्वरावर तुमचा विश्वास आहे का? असं विचारण्यात आलं असता ''हो, नक्कीच आहे. म्हणूनच मी हात वर केले", असंही राज ठाकरे म्हणाले. "सध्या कोरोनामुळे नेमकं काय चाललंय काहीच कळत नाही. तुमच्या हातात काहीच नाही. आता दुसरी लाट येऊन गेली. मग पुन्हा तिसरी येईल असं सांगतायत. मग पुन्हा लॉकडाऊन केलं जाईल यामुळे काहीच ठोस तुम्ही सांगू शकत नाही. कोरोनाच्या संकटातून समाज बाहेर यावा, बाकीच्या गोष्टी होत राहतील", असं राज ठाकरे म्हणाले. ते आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलत होते.
मुंबई महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीनं लढणारआगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील युतीबाबत राज ठाकरे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सध्या तुमच्या हातात काहीच नाही. त्यामुळे खरंच काही सांगता येत नाही. राज्यात सध्या नेमकं कोण राजकीय विरोधक आणि कोण मित्र हेच कळायला मार्ग नाही. कोण कुठल्या बिळातून बाहेर येईल हे समजत नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू, असं राज ठाकरे म्हणाले. निवडणुका येईपर्यंत मनसेची वाटचाल एक पक्ष म्हणून असेल आणि हा मला डोळा मारतोय का, तो पत्र पाठवतोय का, यावर माझी वाटचाल नसेल, असंही राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.