लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भाजी, दूध, फळे वा किरकोळ वस्तूंची खरेदी करायला जाताना सर्रास प्लास्टीकची कॅरी बॅग घेऊन जाणे किंवा दुकानदाराकडून कोणतीही वस्तू प्लास्टीकच्या कॅरी बॅगेत नेणे आता महागात पडणार आहे. एकल वापर प्लास्टीक वरील बंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असून सोमवार, २१ ऑगस्टपासून प्रत्येक वॉर्डात धडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी २४ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. मॉल, बाजारपेठ, दुकाने या ठिकाणी हे पथक छापे टाकणार आहे.
राज्य सरकारने २०१८ मध्ये राज्यभरात प्लास्टीक बंदी लागू केली. त्यानंतर महापालिकेनेही प्लास्टीक बंदीची कारवाई सुरू केली. मात्र, कोरोनाकाळात ही मोहीम थंडावली. कोरोना आटोक्यात आल्यानंतर पालिकेने जुलै, २०२२ पासून पुन्हा एकदा प्लास्टीक बंदीची अंमलबजावणी सुरू केली.
म्हणावी तशी कारवाई पालिकेकडून होत नसल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) या कारवाईत पोलिसांच्या मदतीने पुढाकार घेण्याचे ठरवले त्यानुसार पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाने कारवाईसाठीचा आराखडा तयार केला असून कारवाईसाठी प्रत्येक वॉर्डात पाच सदस्यीय अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्याचा निर्णय घेतला. यात तीन अधिकारी पालिकेचे, एक एमपीसीबीचा एक अधिकारी व एक पोलिस असणार आहे.
यावर बंदी
प्लास्टीक पाऊचेस, कंटेनर, बाऊल्स, २०० मिली. पेक्षा कमी बाटली, एकदा वापर करण्यात येणारे प्लास्टीकचे ग्लास, प्लेट तसेच ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या