ट्रॅफिकच्या चक्रव्यूहातून सुटका कधी? नागरिक पाऊण तास कोंडीत;  कुर्ला, कलिना, चांदिवलीत प्रश्न बिकट 

By सचिन लुंगसे | Published: October 18, 2024 01:19 PM2024-10-18T13:19:29+5:302024-10-18T13:20:04+5:30

२०१९ नंतर आता २०२४ ची विधानसभा निवडणूक जाहीर झाली असली तरी या तिन्ही मतदारसंघांतील वाहतूक समस्या कमी होण्याऐवजी वाढली आहे.

when the Escape from the traffic maze Citizens in dilemma for half an hour The problem is worse in Kurla, Kalina, Chandivali  | ट्रॅफिकच्या चक्रव्यूहातून सुटका कधी? नागरिक पाऊण तास कोंडीत;  कुर्ला, कलिना, चांदिवलीत प्रश्न बिकट 

ट्रॅफिकच्या चक्रव्यूहातून सुटका कधी? नागरिक पाऊण तास कोंडीत;  कुर्ला, कलिना, चांदिवलीत प्रश्न बिकट 

मुंबई : कुर्ला, कलिना आणि चांदिवली विधानसभा मतदारसंघांतील रहिवासी वाढत्या वाहतूक कोंडीमुळे पुरते बेजार झाले आहेत. वाहतुकीच्या या हॉट स्पॉटकडे स्थानिकांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले आहे. 

२०१९ नंतर आता २०२४ ची विधानसभा निवडणूक जाहीर झाली असली तरी या तिन्ही मतदारसंघांतील वाहतूक समस्या कमी होण्याऐवजी वाढली आहे. लाल बहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावरील वाहतूक कोंडीत नागरिकांचा पाऊण तास वाया जात आहे. त्यावर उपाय योजना करण्याऐवजी लोकप्रतिनिधी साड्या, मिक्सर वाटपासह हळदी-कुंकवाचे कार्यक्रम घेण्यात व्यस्त असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ट्रॅफिकचे हॉट स्पॉट
चांदिवली, साकीनाका, काजुपाडा, जरीमरी, सफेदपूल, मरोळ पाइपलाइन, बैलबाजार, कमानी, फिनिक्स मॉल, मायकल हायस्कूल, शीतल सिनेमा,  खाऊ गल्ली, कलिना रोड, कुर्ला डेपो, बुद्ध कॉलनी, बीकेसी एंट्री पॉइंट, सांताक्रूझ (विद्यापीठ) एंट्री पॉइंट.

साकीनाका - अंधेरी, कुर्ला, घाटकोपर आणि पवई दिशेकडील वाहने या जंक्शनवर सातत्याने ये-जा करत असतात. घाटकोपरसह कुर्ल्याकडे जाणारे रस्ते अरुंद असल्याने कोंडीत भर पडते.

जरीमरी - साकीनाक्यापासून बैलबाजार पोलिस चौकीपर्यंतचा रस्ता अत्यंत अरुंद आहे. सकाळ-सायंकाळी गर्दीच्या वेळी बेशिस्तपणे चालविल्या जाणाऱ्या वाहनांमुळे हा रस्ता हमखास अडला जातो.

कलिना एंट्री पॉइंट - गेल्या दोन वर्षांपासून कल्पना सिनेमागृहासमोर महापालिकेने नागरी काम हाती घेतले आहे. यामुळे एलबीएस रस्ता अरुंद झाला आहे. त्यात कुर्ला डेपोच्या सिग्नलपासून हे काम सुरू आहे. सिग्नलसह अरुंद रस्त्यामुळे येथून सुरू झालेल्या वाहनांच्या लांबलचक रांगा शीतल सिनेमागृह ते मायकल हायस्कूलपर्यंत लागलेल्या असतात.

कमानी - गेल्या कित्येक वर्षांपासून बैलबाजार ते कमानी हा रस्ता एक दिशा केला आहे. मात्र, कमानी ते बैलबाजार अशी उलट्या दिशेनेही वाहने धावत असल्याने मध्यरात्री १२ वाजताही या रस्त्यावर कोंडी असते.

बीकेसी एंट्री पॉइंट - कुर्ल्याहून बीकेसीकडे जाताना एलबीएस रस्त्याच्या एंट्री पॉइंटलाच चक्का जाम होतो. सकाळी १० आणि सायंकाळी ६ दरम्यान बीकेसीपासून कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंतचा रस्ता कोंडीत असतो.

एलबीएस रस्त्यावर भंगारवाल्यांनी केलेल्या अतिक्रमण विरोधात कोणीही ‘ब्र’ काढत नाही. परिसरातील नागरिकांना रस्त्यावर चालायला जागा राहत नाही. कुर्ला आणि सायनचा प्रवास नकोसा वाटतो. बीकेसीमधील वाहतूककोंडी तर नकोशी वाटते. कमानी ते बैलबाजार एक दिशा मार्ग कधी सुरू करणार? याचे उत्तर कोणी देत नाही.
- ॲड. राकेश पाटील, उपाध्यक्ष, कलिना विधानसभा, भाजप

विकास आराखड्यातील तसेच ३० ते ४० वर्षांपासून असलेले रस्ते तयार व्हायला हवेत. मात्र, ते होत नाहीत. अंधेरीपासून जेव्हीएलआरपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. या आराखड्यानुसार एका तरी रस्त्याचे काम सुरू झाले का? याचे उत्तर लोकप्रतिनिधींनी दिले पाहिजे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही.
- मनदीपसिंग मक्कर, संस्थापक, चांदिवली सिटीझन्स वेल्फेअर असोसिएशन
 

Web Title: when the Escape from the traffic maze Citizens in dilemma for half an hour The problem is worse in Kurla, Kalina, Chandivali 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.