"आपण हे का केलंत माहिती नाही, पण असे कधीही करू नका..."; आव्हाडांचा मैत्रीचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 12:21 PM2023-08-11T12:21:50+5:302023-08-11T12:59:08+5:30
एकनाथ शिंदे यांच्या या हवाई दौऱ्यात बुधवारी अडथळा आल्यामुळे ते स्पीड बोटीने दरे गावी पोहोचले आहेत.
मुंबई - खराब हवामानमुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं हेलिकॉप्टर (Helicopter) भरकटल्याचे वृत्त माध्यमांत झळकले. एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे या गावी जात होते. मात्र, पाऊस आणि धुक्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर दरे या गावी उतरवणे शक्य झाले नाही. त्यामुळे हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईत राजभवन येथे लँडिंग करण्यात आले. त्यानंतर, स्पीडबोटीने ते दरे गावी गेले आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन मैत्रीचा सल्ला दिला आहे. आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वी आपले अतिशय जवळचे स्नेहाचे संबंध होते, हे मी विसरू शकत नाही, असे आव्हाडांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या या हवाई दौऱ्यात बुधवारी अडथळा आल्यामुळे ते स्पीड बोटीने दरे गावी पोहोचले आहेत. या आधीही अशाच प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर जळगाव विमानतळावर लँडिंग करण्यात आले होते. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांचे जुने मित्र आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना मैत्रिचा प्रेमळ सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्री साहेब, आपल्यामध्ये राजकीय मतभेद जरूर आहेत. पण, मी हे विसरू शकत नाही की, आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वी आपले अतिशय जवळचे स्नेहाचे संबंध होते. काल आपण हट्टाने हेलिकॉप्टरचा पायलट नाही म्हणतं असताना, त्याला हवामान खराब असल्याचे सांगितले जात असतांना देखिल बळजबरीने हॅलिकॉप्टरने गावी जाण्यासाठी उड्डाण घेण्यास सांगितले. आपण हेलिकॉप्टर साताऱ्याला उतरवलतं. त्यानंतर आपण कुठे गेलात हे मला माहीत नाही, असे आव्हाड यांनी म्हटले.
तसेच, हवामान खराब असतांना कधीही हेलिकॉप्टर उडवू नये हे जागतिक अलिखित संकेत आहेत. आपण हे का केलेत ते मला माहित नाही. पण, हे असं करणं महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि आपल्या वैयक्तिक दृष्टीने चुकीचे आहे. "सर सलामत तो पगडी पचास" अशी एक म्हण प्रचलित आहे. आपण अशी भूमिका घेणे किंवा असा हट्ट धरणे हे मला वैयक्तिकरित्या पटलेले नाही. कारण कोणी काहिही म्हणो आपण एकेकाळचे चांगले मित्र होतो. ह्या नात्यानेच मी हे लिहीत आहे. असे पुन्हा कधीही करू नका, असे म्हणत आव्हाड यांनी एकप्रकारे अशी रिस्क न घेण्याचं सुचवलं आहे. त्यांनी एकप्रकारे मैत्रीच दाखला देत प्रेमळ सल्लाच दिला आहे.
साताऱ्यातील दरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव आहे. सध्या ते तीन दिवस आपल्या गावी आहेत. या दौऱ्यात दरे गावात मुक्काम करणार असून या भागातील काही शेतकऱ्यांना भेटून बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देणार आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात ते स्वत: बांबू लागवड करतील. द
यापूर्वीही हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला
या आधीही अशाच प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर जळगाव विमानतळावर लँडिंग करण्यात आले होते. धुळ्यात आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरद्वारे जात होते. दरम्यान, धुळ्याकडे रवाना झाल्यानंतर अचानक पावसाचे सावट आल्याने हेलिकॉप्टरचा मार्ग बदलण्यात आला आणि त्यांचे हेलिकॉप्टर जळगावला उतरविण्यात आले होते.