मितेश घट्टे, अपर पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण
रीचा अनुभव प्रत्येक अधिकाऱ्याच्या कर्तव्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवत असतो. आठ वेळा पंढरीच्या वारीचा बंदोबस्त करताना आलेल्या अनुभवात पोलिसांतील सहनशीलता, संवेदनशीलता, संयम आणि सत्कर्माची जाणीव पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या संतपरंपरेत अत्यंत मानाचे स्थान असलेल्या वारीचा बंदोबस्त करायला मिळणे आणि वारकऱ्यांच्या पांढऱ्या पेहरावासोबत खाकीने मिसळून जाणे याची संधी अपवादात्मक अधिकारी, अंमलदारांना मिळते. आठ वर्षे कधी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या, तर कधी जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या बंदोबस्तात प्रभारी पोलिस अधिकारी म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली होती. पंढरपूरच्या वारीत बंदोबस्ताची संधी आठव्यांदा मिळाली. त्यामुळे वारीच्या मार्गावरील माझी श्रद्धा अधिक वृद्धिंगत झाली.
वारीचे नियोजन करताना पोलिसांवर विविध प्रकारची जबाबदारी असते. लाखो वारकऱ्यांचा मेळा जेव्हा ‘माऊली माऊली’चा गजर करत चालत असतो, तेव्हा त्यांच्या सुरक्षेला पहिले प्राधान्य देणे, हे पोलिसांसमोर आव्हानच असते. वारकरी एका बाजूने चालत असतात, त्याच रस्त्यावर दुसऱ्या बाजूने वारकऱ्यांची, प्रशासनाची, समाजसेवकांची वाहने धावत असतात. त्यामुळे संभाव्य आपत्ती टाळण्यासाठीचा प्रयत्न खूप जिकिरीचा असतो.
मात्र, वारकऱ्यांची अमोघ वाणी, एकमेकांना सहकार्य करण्याची त्यांची आपुलकी, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे त्यांचे कर्तव्य याचा हे सर्व आव्हान पेलताना अनुभव कायम येतो. वारी ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या मार्गावरील एकाही गावातील जनजीवन विस्कळीत होणार नाही, याबाबतही पोलिस काळजी घेत असतात.पालखी सोहळा प्रमुखांशी कायम संवाद ठेवून पोलिस त्यांच्याशी समन्वय साधत पुढची दिशा ठरवतात. यावर्षी मंदिर सुरक्षा आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणारी शासकीय महापूजेच्या वेळची सुरक्षाव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी सोलापूरचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी माझ्यावर सोपविली होती.
कितीही दमले, भागले तरी कर्तव्याचा झेंडा हातात कायम...
कितीही दमले, भागले तरी पोलिसांच्या हाती कर्तव्याचा तर वारकऱ्यांच्या खांद्यावर अध्यात्माचा भगवा झेंडा कायम असतो. सुरक्षेच्या पारंपरिक उपाययोजना राबविल्या जात असताना, दहशतवादी घटनांपासून वारी दूर ठेवण्यासाठी अत्यंत गोपनीय प्रयत्न केले जातात. एवढ्या मोठ्या संख्येने बंदोबस्तात दमलेल्या पोलिसांच्या निवासाचे नियोजन करणे तसे जिकिरीचे, भोजन व्यवस्था आणि त्यांच्या आरोग्याची दक्षता घेणे हे कुटुंबप्रमुख या नात्याने आमचे कर्तव्य असते. एखादे आव्हान पेलताना हा परिवार ताकदीने उतरतो. अर्थात पोलिसांची सोय करताना काही कमी जास्त होते, हे नाकारून चालत नाही.
सर्वच ठिकाणी अगदी चांगली व्यवस्था होते, असे नाही. जमेल तसे, जमेल तिथे तडजोड करून रात्रंदिवस काढावा लागतो. हेही पोलिसांच्या कर्तव्यभावनेचे एक वास्तव आहे. सोलापूरचे अपर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांचा पाठपुरावा, पंढरपूरचे डीवायएसपी डॉ. अर्जुन भोसले यांच्या अंमलबजावणीमुळे वारी सुरक्षित व आपुलकीच्या वातावरणात पार पडली.
मागील २ वर्षांचा अनुभव गाठीशी असलेले तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम रायगडहून खास वारी बंदोबस्तात सहभागी झाले होते. सातारचे पोलिस उपनिरीक्षक माेहन तलवार हे सेवानिवृत्त हाेत असताना त्यांनी स्वतःहून हट्टाने बंदोबस्त मागून घेतला.
दोन महिन्यांपूर्वीच नियोजन
ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता वारकरी एक-एक पाऊल पुढे टाकत असतात. २०-२१ दिवसांचा हा सोहळा अतिसुरक्षितपणे आणि निविघ्नपणे पार पाडण्यासाठी महाराष्ट्र पोलिस दलाकडून दोन-तीन महिने अगोदरच तयारी सुरू असते.
विशेषतः ही जबाबदारी पार पाडण्याचे काम कोल्हापूर परिक्षेत्राकडेच असते. यंदाचा विचार करता परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मॅरेथॉन बैठका घेत प्रत्येक अधिकाऱ्याला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली होती.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, साताऱ्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख, सोलापूर ग्रामीणचे अधीक्षक शिरीश सरदेशपांडे यांची टीम आपापल्या भागात वारी बंदोबस्तासाठी सज्ज होत होती. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेकडे डोळ्यात तेल घालून हे सारे या अध्यात्म सोहळ्यात सहभागी झाले.