मुंबई - राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं असून विधिमंडळात मुख्यमंत्र्यांसह आमदार, मंत्री हजर होते. अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकून सरकारवर हल्लाबोल केला होता. तर, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर फसवणूक नको, आरक्षण द्या, असे म्हणत विरोधकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला घेरलं. त्यातच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संवाद सोशल मीडियातून समोर आला आहे. त्यानुसार, हा संवाद जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी संबंधित असल्याचे समजते.
मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचं कारस्थान होत आहे, मला संपवण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी केला होता. त्यावर, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रथमच तीव्र शब्दात सरकारची भूमिका मांडली, तसेच कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, असेही ते म्हणाले. कायदा- सुव्यवस्था बिघडविण्यासाठी जे जबाबदार असतील त्यांना माफ केले जाणार नाही, सरकारच्या संयमाचा अंत पाहू नका, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले होते. त्यानंतर, आज विधिमंडळ सभागृहाबाहेर एक व्हिडिओ समोर आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाना पटोले हे विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळ बोलत असल्याचे दिसून येते. त्यावेळी, नाना पटोले जरांगेंच्या आंदोलनाबाबत किंवा राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत भाष्य करत असल्याची चर्चा आहे. हे काय चाललंय, या नाना पटोलेंच्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेंनी हातवारे करत स्पष्ट शब्दात उत्तर दिल्याचं दिसून येत आहे. लिमीटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतोच मी... असे उत्तर मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं. तसेच, जोपर्यंत सामाजिक कार्यकर्ता होता, तोपर्यंत ठीक... असेही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटल्याचे दिसून येते.