मुंबई - शिवसेनेत बंड झाल्यानंतर सर्वात पहिलं पत्र तत्कालीन मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी लिहिलं होतं. अखेर शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात दुसरा गट अस्तित्वात आला. या बंडाळीनंतर दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर जोरकसपणे टीका करताना पाहायला मिळतात. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे शिंदे गटावर जोरदार टीका करतात. एकेरी भाषेत व कडक शब्दात प्रहार कतात. तर, शिंदे गटाकडूनही अनेक नेते त्यांना प्रत्युत्तर देतात. त्यात, एक म्हणजे आमदार संजय शिरसाट.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक आज छत्रपती संभाजीनगर येथे झाली. या बैठकीसाठी अख्ख मंत्रिमंडळ येथे आलं होतं. तर, संभाजीनगर येथे शिवसेना खासदार संजय राऊत हेही आल्याचं पाहायला मिळालं. मात्र, येथील एका हॉटेलबाहेर दररोज एकमेकांवर टीका करणारे दोन्ही संजय एकमेकांच्या हातात हात देताना दिसून आले. सध्या या दोन्ही शिवसेनेच्या संजय यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
खासदार संजय राऊत आणि आमदार संजय शिरसाट यांच्या भेटीचा हा व्हिडिओ आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉटेल ॲम्बेसेडरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ संजय राऊत आणि संजय शिरसाट आमने-सामने आले. गाडीतून उतरताच संजय राऊत यांनी आमदार शिरसाट यांना, काय संजय... अशी हाक दिली. त्यावेळी, आमदार शिरसाट हेही लगेच संजय राऊतांकडे आले, आणि दोघांनी हस्तांदोलन केले. शिवसेना नेत्यांच्या या भेटीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तर, एकमेकांवर नेहमीच तोंडसुख घेणारे, एकेरी भाषेत कडक शब्दात टीका करणारे हे नेते एकत्र आल्यावर किती सौम्य आणि प्रेमाने संवाद साधतात, अशी चर्चा व्हायरल व्हिडिओवर होत आहे.
राऊत आले नाहीत का - मुख्यमंत्री
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रपरिषदेला जाणार असे म्हटल्याने जोरदार घमासान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. दरम्यान, खा. राऊत यांनी पास देखील घेतल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिल्याने याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, आज पत्रपरिषदेत खा. संजय राऊत हे अनुपस्थित होते. यावरुन मुख्यमंत्री शिंदे यांनी भर पत्रकार परिषदेत अचानकपणे, राऊत आले नाही का? अशी विचारणा करत टोला लगावला.