पाण्याची पातळी वाढली की सेन्सर वाजणार! वीज कंपन्यांनीही पावसाळ्यासाठी कंबर कसली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 01:26 PM2023-06-08T13:26:57+5:302023-06-08T13:27:48+5:30
मुंबई शहर आणि उपनगर पावसाळ्यासाठी सज्ज झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर पावसाळ्यासाठी सज्ज झाले असून, वीज कंपन्यांनीही कंबर कसली आहे. महावितरण, बेस्ट, टाटा आणि अदानी अशा सर्वच वीज कंपन्यांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीने सखल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील उपकरणांची संख्या वाढवत अत्यंत आव्हानात्मक म्हणून ओळखले गेलेल्या विविध १३७ ठिकाणी पाण्याचा स्तर तपासणारी यंत्रणा बसविली आहे. त्यामुळे पाण्याचा स्तर वाढल्याची माहिती मिळणार असून, उपाययोजना करणे अधिक सोयीचे होणार आहे.
लाइट जाणार : कुर्ला, मालाड, विलेपार्ले, अंधेरीसह विविध ठिकाणी पावसाचे पाणी साचणाऱ्या भागात हे सेन्सर बसविण्यात आले आहेत. पावसामुळे जेव्हा सखल भागातील पाण्याची पातळी वाढेल तेव्हा या सेन्सरद्वारे यंत्रणेला अलर्ट मिळेल. त्यामुळे धोका असलेल्या भागातील वीजपुरवठा खंडित केला जाईल. तत्पूर्वी ग्राहकांना याची माहिती दिली जाईल.
मिस कॉल द्या : तक्रार नोंदणीसाठी किंवा वीज पुनर्पुरवठ्याबाबतची स्थिती जाणून घेण्यासाठी १८००५३२९९९८ वर ग्राहक हे त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून मिस कॉल देऊ शकतात.
नौका आणि उपसा पंप
साहित्य आणि उपकरणे, आपत्कालीन प्रतिसाद नौका आणि वाहने, आपत्कालीन पुरवठा डीजी संच आणि विविध ठिकाणच्या पाण्याचा उपसा करणारे पंप सज्ज आहेत.
साहाय्य क्रमांक - १९१२२ केंद्रीय आपत्ती नियंत्रण क्रमांक - ०२२०५०५४९११ / ५०५४७२२५ मिस कॉल, एसएमएस, व्हॉट्सॲप, संकेतस्थळ, मोबाइल आणि समाज माध्यम मंच ग्राहकांसाठी उपलब्ध
- वीज आपत्ती नियंत्रण केंद्र सक्रीय
- जलद प्रतिसाद चमू सज्ज
- सखल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील उपकरणांची संख्या वाढविणार
वॉकी-टॉकी
उपग्रह, वायरलेस, हॉटलाइन, वॉकी-टॉकी आणि रिमोट डिव्हाइसच्या माध्यमातून केंद्राद्वारे अंतर्गत विभाग आणि बाह्य अधिकारी यामध्ये संवाद होईल. कमीत कमी वेळेत वीजपुरवठा आणि विपरित घटनेवर मदत केली जाईल.