Join us

रुग्णालयात नातेवाईक नसतो तेव्हा ते ठरतात आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये धावपळ करणारे कक्षसेवक, सफाई कामगार नेहमीच आपल्या नजरेस पडतात. कोरोनाच्या काळातही हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये धावपळ करणारे कक्षसेवक, सफाई कामगार नेहमीच आपल्या नजरेस पडतात. कोरोनाच्या काळातही हे पडद्यामागील कोरोना योद्धे स्वच्छतेबरोबर रुग्णांची सेवा करताना दिसत आहेत. यातच, जेव्हा एखाद्या रुग्णाजवळ नातेवाईक नसतो तेव्हा ही मंडळी त्यांच्यासाठी आधार ठरत आहेत. माणुसकी जपताना मात्र आम्ही फक्त आमचे कर्तव्य बजावतो, असे ते सांगतात.

मुंबईत पालिका, सरकारी तसेच खासगी अशी १ हजार ४०० हून अधिक रुग्णालये आहेत. कोरोनाच्या महामारीमध्ये डॉक्टरांबरोबरीने रुग्णालयातील सफाई कामगार, कक्षसेवक महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. रुग्णालयातील स्वच्छतेबरोबर, रुग्णांना चहा, नाश्ता, जेवण आणि औषध देण्यासोबत विविध जबाबदाऱ्यांचे ओझे त्यांच्या खांद्यावर असते. रुग्णालयात रुग्णाबरोबर त्यांच्या नातेवाइकांचा वावर असतो. त्यात मुंबईतील पालिका, सरकारी रुग्णालयत दिवसाला शेकडो लोकांची ये-जा असते. कोरोनाच्या काळात याच गर्दीत मुंबईतील रुग्णालयात ही मंडळीही आपला जीव धोक्यात घालून आपली सेवा बजावताना दिसत आहे.

सर जे. जे. रुग्णालयाच्या बर्न्स तसेच प्लास्टिक सर्जरीच्या वॉर्डमध्ये काम करणारा तुषार सोलंकी सांगतो की, आम्ही आमचे रुग्णसेवेचे कर्तव्य पार पाडतोच; पण ज्या रुग्णांंसोबत कोणी नसते, तेव्हा आम्हीच त्यांच्या आंघोळीपासून ड्रेसिंगपर्यंत सर्व सेवा करतो. सोलंकी हे गेल्या ११ वर्षांपासून येथे कार्यरत आहेत. तर दुसरीकडे, प्लास्टिक सर्जरीच्या शस्त्रक्रिया विभागात कक्षसेवक म्हणून कार्यरत असलेले दगडू चौधरी ३४ वर्षांपासून सेवा बजावत आहेत. तेदेखील वेगवेगळे रुग्ण हाताळतात. काम करताना कोरोनाची भीती वाटत नसल्याचेही ते नमूद करतात.

सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले योगेश सोलंकीही यूजी, पीजीच्या डॉक्टरांसाठी असलेल्या लायब्ररीची स्वच्छता करण्याचे काम करतात. यापूर्वी त्यांनी कोविड सेलमध्येही जबाबदारी बजावली. कर्तव्याबरोबर समाजसेवाही सुरू आहे. २६/११ च्या हल्ल्यादरम्यान सेवेत नसतानाही त्यांनी जखमींसाठी सेवा बजावली होती. तसेच कर्तव्यानंतर परिसरातील झोपडपट्टी भागात त्यांची सेवा सुरू असते.

....

कोविड सेलमध्येही उल्लखेनीय कामगिरी

कस्तुरबासह विविध कोविड सेंटरमध्येही हे सफाई कामगार, कक्षसेवक पीपीई किट घालून साफ सफाई करत असतात. तसेच जिथे जवळचे नातेवाईक पुढे येण्यास घाबरतात तिथे ही मंडळी त्यांच्यासाठी दिवस-रात्र कार्यरत आहेत.

...