Join us

लोकलच्या उद्घोषणांमधून ‘अश्लील’आवाज येतात तेव्हा....

By admin | Published: October 29, 2015 12:58 AM

स्थानकांवर किंवा लोकलमध्ये असलेल्या उद्घोषणांमधून कर्मचाऱ्यांची चर्चा किंवा चित्रपटातील गाणी प्रवाशांना ऐकू आल्याच्या अनेक घटना पश्चिम व मध्य रेल्वेवर घडत असतात

मुंबई : स्थानकांवर किंवा लोकलमध्ये असलेल्या उद्घोषणांमधून कर्मचाऱ्यांची चर्चा किंवा चित्रपटातील गाणी प्रवाशांना ऐकू आल्याच्या अनेक घटना पश्चिम व मध्य रेल्वेवर घडत असतात. याची दखल मात्र रेल्वेकडून घेतली जात नाही. मात्र, एका विचित्र घटनेमुळे पश्चिम रेल्वेच्या ‘अब्रू’चे धिंडवडे उडाले. या प्रकाराची मात्र दखल रेल्वेला घ्यावीच लागली. अंधेरी ते ग्रॅन्ट रोडपर्यंतच्या लोकल प्रवासात गार्डच्या मोबाइलमध्ये सुरू असलेले ‘अश्लील’आवाजातील प्रकार लोकलमधील सर्व डब्यांतील प्रवाशांना ऐकू गेले आणि हे आवाज सहन न झालेल्या प्रवाशांनी याची तक्रार रेल्वेकडे करताच, या गार्डला निलंबित करण्यात आले. मंगळवारी दुपारी बोरीवलीहून चर्चगेटला जाण्यासाठी विशेष लोकल सोडण्यात आली. ही लोकल अंधेरीनंतर जलद होती. या लोकलवर एस. शर्मा हे गार्ड म्हणून कार्यरत होते. अंधेरीला लोकल येताच, शर्मा यांनी आपल्या केबिनमधूनच अंधेरीहून चर्चगेटला जाणारी जलद लोकल असल्याची माहिती प्रवाशांना उद्घोषणेव्दारे दिली. ही माहिती दिल्यानंतर लोकल सुरू झाली. मात्र, मोबाइलवर ‘अश्लील’ प्रकार पाहण्यात दंग असलेले शर्मा हे आपल्या केबिनमधील उद्घोषणा यंत्रणा बंद करण्याचे विसरून गेले. त्यामुळे मोबाइलमधून येणारे चित्रविचित्र आवाज या उद्घोषणेमधून बाहेर पडू लागले आणि ते प्रवाशांच्या कानी पडले. ही ट्रेन मुंबई सेन्ट्रल स्थानकानंतर धीमी असल्याने अंधेरीपासून ते ग्रॅन्ट रोड स्थानकापर्यंत चित्रविचित्र आवाजांचा प्रकार सुरूच राहिला. याची गंभीर दखल काही प्रवाशांनी घेतली आणि त्या विरोधात ग्रॅन्ट रोड स्थानकात स्टेशन मास्तरकडे तक्रार दाखल केली. यानंतर त्वरित सूत्र हलली आणि पश्चिम रेल्वेकडून गार्ड शर्मा यांना निलंबित करण्यात आले. याबाबत पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेन्द्र कुमार यांनी सांगितले की, ‘हा धक्कादायक प्रकार आहे. याची दखल आम्ही घेतली असून, गार्डला निलंबित केले आहे. या प्रकारची चौकशीही केली जाणार आहे.’ (प्रतिनिधी)रेडिओ कम्युनिकेशन यंत्रणा आणणारमोटरमन, गार्ड, स्टेशन मास्तर, रेल्वे नियंत्रण कक्षाशी समन्वय राहावा आणि संपर्क साधता यावा, यासाठी रेडिओ कम्युनिकेशन ही यंत्रणा आणली जाणार आहे. तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. प्रत्येक लोकलमधील मोटरमन व गार्ड केबिनमध्ये ही यंत्रणा असेल. यामुळे गार्ड आणि मोटरमन याचा मोबाइल बंद होऊन ते केवळ याच यंत्रणेद्वारे संपर्क करू शकणार आहेत. त्यासाठी पाच कोटींचा खर्च आहे. डेन्मार्क देशातून ही यंत्रणा आणली जाईल, असे शैलेन्द्र कुमार यांनी सांगितले. लोकलच्या सर्व डब्यात प्रवाशांना ऐकू येणारा ‘अश्लील आवाज’ मोटरमनलाही येत होता. त्यामुळे मोटरमनकडून इमर्जन्सी बेल वाजवून अ‍ॅलर्ट करण्याचा प्रयत्न गार्डला करण्यात आला, पण त्याकडे गार्डचे दुर्लक्ष झाल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. नियमांचे काय ? : लोकल चालवताना मोबाइल बंद ठेवण्याचा नियम हा मोटरमनसाठी आहे. हा नियम गार्डसाठी नसल्याचे सूत्रांनी सांगितले. एखादा प्रसंग उद्भवल्यास रेल्वे नियंत्रण कक्षाशी किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी गार्डकडून मोबाइल सुरू ठेवला जातो.