लॉकडाऊनमध्ये भाजीमंडईत शेंगा विकणारा 'विठ्ठल' चित्रपटाचा 'नायक' असतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 04:10 PM2021-07-08T16:10:05+5:302021-07-08T21:15:56+5:30

सध्या झी टॉकीज अन् सोशल मीडियावर रिलीज झालेले 'पुनश्च हरिओम' चित्रपटाचे हे टिझर चित्रपटाची उत्सुकता वाढवत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'पुनश्च हरिओम' म्हटल्यानंतर महाराष्ट्राने सुटकेचा निश्व:स टाकला

When there is a 'hero' of the movie 'Vitthal kale' who sells legumes in the vegetable market in lockdown, punasch hari om | लॉकडाऊनमध्ये भाजीमंडईत शेंगा विकणारा 'विठ्ठल' चित्रपटाचा 'नायक' असतो तेव्हा...

लॉकडाऊनमध्ये भाजीमंडईत शेंगा विकणारा 'विठ्ठल' चित्रपटाचा 'नायक' असतो तेव्हा...

ठळक मुद्देसध्या झी टॉकीज अन् सोशल मीडियावर रिलीज झालेले 'पुनश्च हरिओम' चित्रपटाचे टिझर सिनेमाची उत्सुकता वाढवत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'पुनश्च हरिओम' म्हटल्यानंतर महाराष्ट्राने सुटकेचा निश्व:स टाकला होता.अभिनेता विठ्ठल काळे अन् स्पृहा जोशी यांच्या तगड्या अभिनयाने लॉकडाऊन काळातील गरीब कुटुंबाच्या संघर्षाची अशीच एक कथा टेलिव्हीजन पडद्यावर प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून विठ्ठल काळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचत आहे.

मयूर गलांडे

मुंबई - आरशात पाहून कपाळावर टिकली लावून, हातातल्या बांगडीचा गोठ मागे सारणारी स्पृहा सर्वसामान्य कुटुंबातील स्त्रीच्या भूमिकेतंही तिचं सौंदर्य खुलवते. तितक्यात आईsss... बाबा आले गाडी घेऊन... असे म्हणत आनंदाने उड्या मारणारी चिमुकली अन् वडिलांच्या रुपात जुन्या स्प्लेंडरवर मुलीला पाहताच भारावून गेलेला बाप विठ्ठल ... गरिबाच्या घरची श्रीमंती दर्शवणारा हा सीन पाहिल्यानंतर आपलेपणा जाणवतो, ही कथा आपलीच वाटायला लागते. 

सध्या झी टॉकीज अन् सोशल मीडियावर रिलीज झालेले 'पुनश्च हरिओम' चित्रपटाचे टिझर सिनेमाची उत्सुकता वाढवत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'पुनश्च हरिओम' म्हटल्यानंतर महाराष्ट्राने सुटकेचा नि:श्वास टाकला. पण, लॉकडाऊनमध्ये झालेली वणवण, उपासमार, संघर्ष हा कायमच्या जखमांसारखा आपल्या मनावर राहणार आहे. अभिनेता विठ्ठल काळे अन् स्पृहा जोशी यांच्या तगड्या अभिनयाने लॉकडाऊन काळातील गरीब कुटुंबाच्या संघर्षाची अशीच एक कथा टेलिव्हीजन पडद्यावर प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून विठ्ठल काळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचत आहे. अभिनयात कसलेल्या विठ्ठलच्या अभिनयाची वारी, आता महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचत आहे. पानगाव ते महाराष्ट्रभर झळकणाऱ्या विठ्ठलचा प्रवासही चित्रपटात दाखवलेल्या संघर्षमय प्रवासाइतकाच खडतर आहे. 

बार्शी तालुक्यातील 4-5 हजार वस्ती असलेलं पानगाव. या छोट्याशा गावात राहूनही बालपणापासूनच अभिनेता होण्याचं स्वप्न पाहणारा विठ्ठल आज कसदार कलाकार, दर्जेदार अभिनेता बनलाय. परिस्थिती अन् संघर्षाच्या मानाने विठ्ठलचा प्रवास 'स्काय इज द लिमिट'ची स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. कारण, एका गरीब शेतकऱ्याच्या पोरानं अभिनेता होण्याचं स्वप्न सत्यात उतरवणं हेही स्वप्नासारखच आहे. शेतात राबणाऱ्या माय-बापाला मदत करत शिक्षण करणाऱ्या विठ्ठलच्या प्रतिभेला बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयातील युवा महोत्सवातून भरारी मिळाली. पुण्यात पत्रकारितेचं शिक्षण घेत असताना लहानसहान भूमिकांमधून विठ्ठलने आपली आवड जोपासली, हीच आवड त्याला त्याच्या ध्येयप्राप्तीकडे घेऊन जाणारी ठरली. पुण्यातील मित्रांसोबत अनेक शॉर्टफिल्ममध्ये काम केलं. तिथून सुरू झालेला प्रवास आता झी टॉकीजच्या 'पुनश्च हरिओम'पर्यंत पोहोचला आहे. विठ्ठल आता महाराष्ट्राचा अभिनेता बनला आहे. सिंहासनच्या जब्बार पटेलांपासून ते सैराटच्या नागराज मंजुळेंपर्यंतच्या दिग्गजांमध्ये आता सोलापूरचा आणखी एक सुपुत्र पुनश्च हरिओम म्हणत सिनेसृष्टीत झळकलाय. 

अगोदर झी टॉकीजकडून चित्रपटासंदर्भात विचारणा झाली. त्यावेळी गावाकडेच असल्याने लॉकडाऊनमध्ये चित्रपट होतोय हेच ऐकून भारी वाटलं. त्यामुळे, वनलाईन स्टोरी ऐकल्यानंतर स्क्रीप्ट मागवून घेतली. लॉकडाऊनच्या नकारात्मक वातावरणात सकारात्मकतेची पेरणी करणारी कथा असल्याने लगेचच होकार कळवून चित्रपटाच्या कामाला सुरुवात केली. विशेष म्हणजे कडक निर्बंध असतानाच रीतसर परवानगीने मी पानगाव ते पुणे आणि लोकेशननुसार शुटींगचं काम पू्र्ण केल्याचं विठ्ठल काळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

लॉकडाऊनमध्ये भाजी मंडईत विकल्या शेंगा

विठ्ठल आज सिनेसृष्टीत झळकतोय, दिग्गजांच्या पंक्तीला बसतोय. पण त्याच्यातला हाडाचा शेतकरी लॉकडाऊनमध्येही बार्शीकरांनी पाहिलाय. विठ्ठलने शेतात लावलेल्या शेवग्याच्या शेंगा 1 महिन्यापूर्वीच वडिलांसोबत बार्शीच्या भाजी मंडईत विकल्या आहेत, जमीनीवर असलेल्या अभिनेत्याची हीच खरी ओळख आहे. पानगावच्या काळे कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे शेती, याच कुटुंबातील विठ्ठलचा श्वास 'अभिनय'. मात्र, अभिनय क्षेत्रात एक उंची गाठलेला विठ्ठल गावाकडे आल्यावर रानात रमतो. नुकतेच, लॉकडाऊनमध्ये 500 झाडांची शेवग्याच्या शेंगांची बाग त्याने लावली होती. त्यापैकी, 200 ते 250 झाडं जगली अन् त्याला शेंगाही आल्या. या शेंगा बार्शीच्या भाजी मंडईत 90 रुपये किलो दराने विकल्या. तेव्हा मार्केटमध्ये 5 रुपयाला एक शेंग असा भाव होता, असेही हा शेतकरीपुत्र अभिमानाने सांगतो. 

आई वडिलांसाठी घेतला खास सेट टॉप बॉक्स

गावकडच्या घरी आई-वडिल, भाऊ वहिनी असा परिवार आहे. घरी टीव्ही आहे, पण बटन दाबल्यावर जे दिसतंय ते पाहायचं हाच प्रपंच. पण, आता झी टॉकीजवर आपला लेक दिसणारंय म्हणून आई वडिलांच्या हट्टामुळेच विठ्ठलने झीचा सेट टॉप बॉक्स घेऊन दिलाय. या सेट टॉप बॉक्सवरुन घरातल्या 21 इंचच्या पडद्यावर रविवारी विठ्ठलचा पुनश्च हरिओम हा चित्रपट हे शेतकरी दाम्पत्य पाहणार आहे, त्यांच्यासोबतच पानगाव, बार्शी आणि महाराष्ट्रालाही बार्शीचा विठ्ठल दिसणार आहे.  

आजपर्यंत 3 राष्ट्रीय पुरस्कार चित्रपटांत काम

विठ्ठलने आजपर्यंत सलाम, आजचा दिवस माझा, दुसरी गोष्ट, निळकंठ मास्तर, डिस्को सन्या, कागर या चित्रपटात काम केलं आहे. तसेच, सई ताम्हणकरसोबतच्या राक्षस चित्रपटातही तो झळकला होता. तर, हॉलिवूडची निर्मित्ती असलेल्या 'हॉटेल मुंबई' या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासमवेत काम केलं. या चित्रपटातीलही त्याचा अभिनय लक्षवेधी ठरला. विठ्ठलने आत्तापर्यंत 115 लघुचित्रपटात काम केलं आहे. त्यापैकी, 2015 मध्ये केलेल्या 'अरण्यक' आणि 2016 मध्ये केलेल्या 'औषध' या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. नुकतेच 2020 साठी काजरो या कोकणी चित्रपटालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून त्यामध्ये विठ्ठल प्रमुख भूमिकेत आहे. तर, द मिसिंग स्टोन, एक थी बेगम... या वेबसिरीजमधूनही तो जगभर पोहोचला आहे. आगामी काळातही विठ्ठलचे अनेक प्रोजेक्ट अभिनयाच्या पंंढरीत दुमदुमणार आहेत. त्यापैकी, 'पोरगं मजेत आहे', हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

दरम्यान, या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत, मध्यमवर्गीय कुटुंबाची लॉकडाऊनमधील संघर्षाची सकारात्मक कथा आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना नक्कीच हा चित्रपट आवडेल, चित्रपट आपलासा वाटेल. झी टॉकीजने केलेल्या सर्वेक्षणानुसार रविवारच्या प्रिमियर शोमध्ये अंदाजे 7 कोटी प्रेक्षक हा चित्रपट पाहतील, असे विठ्ठलने सांगितले. 

कॅरेक्टरमध्ये एकरुप होणारा अवलिया

अतिशय टॅलेंट अभिनेत्यासोबत काम करताना आनंद झाला. आपल्या कॅरेक्टरमध्ये पूर्णपणे एकरुप होणार हा अवलिया कलाकार, एक कलाकार, अभिनेता म्हणून मला याचा मत्सर वाटतो. कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेत आपलं मूळ कायम जपणारा माणूस, या माणसाकडून खूप काही शिकायला मिळालं. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त 'काजरो' या कोकणी चिपटात प्रमुख भूमिका साकारलेला नायक विठ्ठल काळे... अशा शब्दात स्पृहा जोशीने विठ्ठलच्या अभिनयाचं कौतुक केलंय.
 

Web Title: When there is a 'hero' of the movie 'Vitthal kale' who sells legumes in the vegetable market in lockdown, punasch hari om

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.