नुसतीच हवा; मेट्रोत बसणार कधी...?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 12:25 PM2022-03-20T12:25:09+5:302022-03-20T12:25:32+5:30
मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही मेट्रो सुरू करण्याचा डाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली असून, तोवर तरी मेट्रोची नुसतीच हवा असणार आहे आणि मेट्रोत बसण्यासाठी प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागणार आहे.
- सचिन लुंगसे
मुंबईच्या पश्चिम उपनगरातला प्रवास सुसह्य करण्यासह लोकल सेवेवरील ताण हलका करण्यास प्रगतिपथावर असलेल्या मेट्रो - २ अ आणि मेट्रो - ७ कित्येक डेडलाईन उलटूनही आजही धावलेली नाही. कधी सुरक्षा चाचण्या, कधी कोरोना, कधी साहित्याची चणचण तर कधी कामगारांची वाणवा अशा असंख्य कारणांमुळे मेट्रो धावण्यास विलंब होत आहे. त्यात मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही मेट्रो सुरू करण्याचा डाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली असून, तोवर तरी मेट्रोची नुसतीच हवा असणार आहे आणि मेट्रोत बसण्यासाठी प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागणार आहे.
कोरोना काळात परदेशातून देशात आयात होणारे साहित्य खोळंबले. कामगार आपआपल्या गावी गेले. तंत्रज्ञानात अडथळे आले. अशा अनेक कारणांचा पश्चिम उपनगरातील मेट्रोच्या कामाचा परिणाम झाला.
आता मेट्रोची धुरा सांभाळणारे एस. व्ही. आर. श्रीनिवासदेखील कित्येक वेळा मेट्रोच्या चाचणीला धावून आले आहेत. मात्र मेट्रो सुरू करण्याच्या प्रश्नावर लवकरच या एका शब्दाशिवाय फारसा प्रतिसाद नाही. जानेवारी २०२२ मध्ये मेट्रो प्रवाशांना घेऊन धावणार, असे सांगणारे प्राधिकरण डेडलाईन उलटल्यामुळे कित्येक वेळा तोंडघशी पडले आहे. सुरक्षा प्रमाणपत्र, सुरक्षा चाचण्या अशी अनेक कारणे देत प्राधिकरणाने मेट्रोच्या चाचण्यांचा सपाटा लावला आहे. टीव्ही माध्यमांना सोबत घेऊन प्राधिकरणाने प्रवाशांना मेट्रो आतून बाहेरून दाखविली आहे. पण मेट्रो लवकरच सुरू होणार का, या प्रश्नाचे उत्तर काही प्रवाशांना मिळालेले नाही. नुकतेच मेट्रोच्या चाचणीसाठी खुद्द ‘युवराजां’च्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आले होते. तेव्हादेखील मेट्रो लवकरच सुरू होणार, या आश्वासनापुढे प्राधिकरणे गेलेले नाही.
मेट्रो लाइन २ अ - दहिसर पूर्व ते डीएन नगर
मेट्रो लाइन ७ - अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्वे
किती असेल तिकीट : किमान तिकीट १० तर कमाल तिकीट ४० रुपये असणार आहे.