Join us

कुटुंबातील तरुणांचे लसीकरण कधी, ज्येष्ठांना सतावतेय चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:07 AM

ओमकार गावंडलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरण एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यासाठी देशभरात लसीकरणाला सुरुवात ...

ओमकार गावंड

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरण एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यासाठी देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला ४५ वयोगटांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सरकारने परवानगी दिली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचे लसीचे दोन डोसदेखील पूर्ण झाले. यानंतर सरकारच्यावतीने १८ ते ४५ वयोगटांतील तरुणांच्या लसीकरणालादेखील परवानगी देण्यात आली. मात्र, काही दिवसांनंतर राज्यातील व शहराशहरांमध्ये लसींचा तुटवडा भासू लागला. यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण थांबले. लसीकरण केंद्रावर लस दाखल झाल्यानंतर दोन-तीन दिवसांत साठा संपत असल्याने अनेकांना ऑनलाईन बुकिंग करूनदेखील लस मिळालेली नाही.

लसींचा वारंवार तुटवडा भासत असल्याने लसीकरणाच्या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण होत आहे. यामुळे आता घरातील ज्येष्ठ नागरिकांना तरुणांच्या लसीकरणाची चिंता सतावू लागली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे सरकारने तातडीने उपाययोजना करून तरुणांचे लसीकरण सुरळीत करावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक करू लागले आहेत.

पहिला डोस / दुसरा डोस

ज्येष्ठ - ८,०७,५४३ / ३,३५,५५९

४५ ते ६० - ८,६२,६८६ / १४३९३९

१८ ते ४४ - ५३,०२४ / ०

तरुण कामासाठी बाहेर जातात त्यांनाही लवकर लस मिळावी

ज्येष्ठांचे लसीकरण सुरळीत पार पडले. मात्र, शासनाने तरुणांच्या लसीकरणाकडेदेखील लक्ष द्यायला हवे. कामानिमित्त तरुण घराबाहेर जात असल्याने त्यांना संसर्गाचा अधिक धोका आहे. त्यामुळे तरुणांनादेखील लस मिळायला हवी.

- दत्ताराम म्हात्रे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हाच एक उपाय आहे. शहरातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर मुबलक प्रमाणात लसी उपलब्ध होतील व तरुणांचे लसीकरण सुरळीत पार पडेल याकडे शासनाने लक्ष द्यायला हवे.

- प्रमोद मढवी

.....................................