मुंबई : आरटीई (शिक्षणाचा अधिकार) कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देणे बंधनकारक असताना या प्रवेशाचा राज्यभरात बोजवारा उडाला आहे. आरटीईअंतर्गत सुमारे ९ हजार जागा रिक्त असून आरटीईची तिसरी प्रवेश फेरी कधी पार पडणार, असा सवाल पालकांमधून विचारला जात आहे.तिसऱ्या फेरीसाठी शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केल्याचे अनुदानित शिक्षण बचाव समितीने सांगितले. मात्र प्रशासनाकडून केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप समितीचे प्रमुख के. नारायण यांनी केला आहे. ते म्हणाले की, आरटीईनुसार राज्यातील खासगी शाळांमध्ये यंदाही हजारोंच्या संख्येने राखीव जागांवरील प्रवेश रिकामेच आहेत. मात्र या रिकाम्या जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही आहे. याउलट आरटीईच्या जागांवर इतर प्रवेश करून शिक्षण हक्क अधिकार कायद्याची पायमल्ली होत असल्याचा आरोपही नारायणन यांनी केला आहे.मुंबईतील खासगी शाळांमध्ये १२ हजारांहून अधिक राखीव जागा आहेत. मात्र दोन फेऱ्यांमध्ये केवळ ६ हजार जागाच भरल्या गेल्या आहेत. त्यातही आॅनलाइन नोंदणीतून प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त २ हजार ६०० विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले होते. त्यामुळे ९ हजारांहून अधिक जागा अद्यापही शिल्लक असल्याचे समितीचे म्हणणे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या जागा भरण्यासाठी प्रशासनाकडूनही म्हणावी तशी कार्यवाही होत नसल्याचा आरोप समितीने लावला आहे. एकंदर या दिरंगाईच्या धोरणामुळे विद्यार्थी व पालक चिंतेत आहेत. (प्रतिनिधी)
आरटीईच्या तिसऱ्या फेरीला मुहूर्त कधी?
By admin | Published: August 20, 2016 5:00 AM