मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केल्यामुळे राज्यात सर्वच राजकीय पक्ष आणि शिवभक्तांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या वादावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते व राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, इतरही राजकीय पक्षांनी संताप व्यक्त केला. खासदार संजय राऊत यांनीही आपले मत मांडले. त्यानंतर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.
भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयातून प्रकाशित करण्यात आलेलं 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' हे पुस्तक अतिशय वादग्रस्त ठरलं आहे. मोदी आणि शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं सर्वच स्तरातून भाजपावर टीका करण्यात येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर मनसेनेही इशारा दिला आहे. या पुस्तकातील मोदींच्या तुलनेवरुन संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या वंशाजांना प्रश्न विचारला होता. तसेच, ट्विटवरुन आपले मतही मांडले होते. याबाबत, आमदार शिवेंद्रराजे अन् छत्रपती संभाजीराजे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. तर, उदयनराजे भोसले हेही उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र, या वादावरुन चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना टार्गेट केलंय. तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल पुस्तकात आक्षेपार्ह शब्द वापरले होते, त्यावेळी राऊत यांनी ट्विट का केलं नाही, असा प्रश्नही पाटील यांनी विचारला. तसेच, मुळात हे पुस्तक भाजपचं अधिकृत पुस्तक नाही. या पुस्तकाबद्दल तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते म्हणा, पण त्यावरून तुम्ही भाजपावर राग का काढता, असेही पाटील म्हणाले.
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सेवा दलाकडून सावरकर आणि गोडसे यांच्याबाबत अपशब्द वापरण्यात आले, त्यावेळी संजय राऊत यांची बोलती बंद का होती? त्यावेळी त्यांनी ट्विट का केले नाही?. तसेच तुम्ही महाशिवआघाडीतील ‘शिव’ शब्दही काढून टाकला, अशा शब्दांत त्यांनी पाटील यांनी राऊत आणि शिवसेनेवर टीका केली. रात्रीनंतर दिवस उगवतो हे ध्यान्यात असू द्या. आमची सत्ता येईल तेव्हा तुम्हाला तोंड लपवायला जागा शिल्लक असणार नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी धाडसी निर्णय घेतात. मोदींचा कारभार शिवरायांसारखा असल्याचं मला वाटतं. त्यामुळेच पुस्तकाला 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' नाव दिल्याचं गोयल म्हणाले. पुस्तक बाजारात आलेलं आहे. मात्र पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम असेल, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे पुस्तक मागे घेण्याचीदेखील तयारी जय भगवान गोयल दर्शवली आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व निवडणूका भाजपा ताकदीने लढून यश मिळवेल, असा दावाही त्यांनी केला.