मुंबई- गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी वेळेअभावी तहकूब करून पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे.
संजय राऊत तुरुंगात असले तरी त्यांची लेखणी थांबलेली नाही. त्यांनी ८ ऑगस्ट रोजी सत्र न्यायालयाबाहेर एका बाकड्यावर बसलेलं असताना मिळालेल्या मोकळ्यावेळेत आपल्या आईसाठी पत्र लिहिलं होतं. या पत्राबाबत आता ठाकरे गटातील नेते सचिन आहिर यांनी खुलासा केला आहे.
संजय राऊत यांनी आईला भावनात्मक पत्र लिहिलं. त्यामध्ये मी पुन्हा येईन, मात्र इतरांसारखं नाही. तर जिद्दीनं आणि जोमानं येईल याचा उल्लेख करताना संजय राऊत विसरले नाही, असं सचिन आहिर म्हणाले. तसेच आम्ही संजय राऊतांना जेव्हा भेटतो, तेव्हा ते नेहमी 'मै झुकेगा नही', असं म्हणतात, अशी माहिती सचिन आहिर यांनी दिली.
दरम्यान, संजय राऊत यांनी आपल्या पत्रात त्यांना झालेली अटक आणि त्यावेळीच्या प्रसंगाची कहाणी कथन केली आहे. तसंच या कठीण काळातही आई पाठिशी ठामपणे उभी होती. तसंच तिच्याकडूनच संघर्षाची शिकवण मिळाल्याचं राऊतांनी पत्रात नमूद केलं आहे. शिवसेनेतील ऐतिहासिक बंडानंतर संजय राऊत यांच्याजवळ त्यांच्या मातोश्रींनी काहीतरी करा आणि शिवसेना वाचवा अशी भावना व्यक्त केली होती याचीही आठवण राऊत यांनी पत्रातून करुन दिली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"