बारावीच्या परीक्षांचा निर्णय होणार तरी कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:06 AM2021-06-02T04:06:30+5:302021-06-02T04:06:30+5:30
सीबीएसईसह राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचा सवाल; संभ्रम कायम, धाकधूक वाढली लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सीबीएसई बारावी परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण ...
सीबीएसईसह राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचा सवाल; संभ्रम कायम, धाकधूक वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सीबीएसई बारावी परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून मंगळवारी निर्णय जाहीर करण्याची शक्यता होती, मात्र निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. २३ मे रोजी केंद्रीय शिक्षण विभागाची बारावी परीक्षांसाठी महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीतील चर्चेनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी १ जूनपर्यंत आम्ही बारावीच्या परीक्षांच्या निर्णयाची घोषणा करू, असे म्हटले होते. मात्र साेमवारी यासंदर्भात काेणताही निर्णय जाहीर न झाल्याने सीबीएसई विद्यार्थ्यांसोबत राज्य मंडळाच्या बारावीच्या विद्यर्थ्यांचीही धाकधूक वाढली आहे. बारावीच्या परीक्षांचा निर्णय होणार तरी कधी? असा प्रश्न त्यांना सतावत आहे.
बारावीच्या परीक्षांबाबत काय निर्णय हाेणार? परीक्षा झाल्या तर कोणत्या पद्धतीने होणार? स्वरूप काय असणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित असल्याने देशातील बारावीचे लाखो विद्यार्थी आणि पालक संभ्रमात आहेत.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतलेल्या देशातील सर्व राज्यांच्या बैठकीत महाराष्ट्राने ‘नो एक्झामिनेशन रुट’ या पर्यायाचा विचार व्हावा, असे सुचविले होते. त्यामुळे राज्य शिक्षण विभाग दहावीच्या परीक्षांप्रमाणेच बारावीच्या लेखी परीक्षा रद्द करून मूल्यमापन किंवा अन्य कोणत्या पर्यायांवर विचार करत आहे का, असा प्रश्नही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. मात्र अद्याप यावर राज्य शिक्षण मंडळाने काेणतेही स्पष्टीकरण न दिल्याने राज्यातील १४ लाख विद्यार्थ्यांची चिंता वाढत आहे.
मागील जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ आम्ही एकाच वर्गाचा एकच अभ्यासक्रम शिकत आहोत आणि आता शिक्षण विभागाने परीक्षांबाबत निर्णय घेऊन पुढील शैक्षणिक वाटचालीचा मार्ग मोकळा करावा, अशी बारावीच्या विद्यार्थ्यांची मागणी आहे.
दरम्यान, बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत किंवा रद्द करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक पुढील काही काळात जाहीर केले तरीही विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान काही दिवसाचा कालावधी देण्यात येईल, मात्र त्यावर आताच भाष्य करणे योग्य नसल्याची माहिती काही शिक्षण अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.
* बारावीचा अभ्यास करायचा की प्रवेश परीक्षांचा?
बारावी परीक्षेचा अभ्यास करायचा की नीट, जेईई, सीईटी यासारख्या प्रवेश परीक्षांचा अभ्यास करायचा, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. कारण बारावीचा अभ्यासक्रम आणि इतर प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम वेगळा आहे. प्रवेश परीक्षा न देणारे विद्यार्थीही तणावाखाली असून, मुंबईतील नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते. या तणावग्रस्त परिस्थितीत परीक्षा झाल्या तर निश्चित गुणांवर परिणाम होऊन प्रवेशाची संधी कमी होईल, अशी भीतीही विद्यार्थी व्यक्त करत आहेत.
.....................................................................