Join us

मुंबईत अडीचशे मीटर ब्रेक टेस्ट ट्रॅक केव्हा होणार?- उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 1:13 AM

मुंबईतील आरटींओमध्ये कायद्यानुसार, अडीचशे मीटर ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध करण्यास आणखी काही दिवसांची मुदत वाढवून मिळावी, यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

मुंबई : मुंबईतील आरटींओमध्ये कायद्यानुसार, अडीचशे मीटर ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध करण्यास आणखी काही दिवसांची मुदत वाढवून मिळावी, यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. हलक्या वाहनांसाठी शंभर मीटर ब्रेक टेस्ट ट्रॅक वापरण्याची परवानगी द्यावी, यासाठीही सरकारने न्यायालयाला विनंती केली आहे.केंद्रीय मोटर वाहन कायद्यानुसार, प्रत्येक आरटीओमध्ये वाहनांची ब्रेक टेस्ट करण्यासाठी अडीचशे मीटरचा ट्रॅक असणे बंधनकारक आहे. मात्र, राज्यात या नियमाचे पालन होत नसल्याने, पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कर्वे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे होती.मुंबईत जागेची कमतरता असल्याने, उच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत अडीचशे मीटरच ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध करण्यास सरकारला अपयश आल्याने, सरकारने मुदत वाढवून मिळण्यासाठी एप्रिलमध्ये न्यायालयात अर्ज केला. त्यावर न्यायालयाने सरकारला अंशत: दिलासा देत, मुंबईत अडीचशे मीटर ट्रॅक उपलब्ध करून देण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदत दिली. मात्र, याही मुदतीत ट्रॅक उपलब्ध करण्याची शक्यता नसल्याने, राज्य सरकारने आणखी काही दिवसांची मुदतवाढ मागण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र, राज्य सरकार केवळ मुदत वाढवून घेत, असल्याने उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.वर्सोवा, अंधेरी, वडाळा या ठिकाणी अडीचशे मीटरचे ट्रॅक उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली.कधीपर्यंत हे ट्रॅक उपलब्ध करण्यात येणार, याची माहिती २७ जूनपर्यंत द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.दरम्यान, ठाणे व नागपूर येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकचे काम जुलैअखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली.

टॅग्स :न्यायालय