मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच उशिरा सुरू झालेली अकरावी प्रवेश प्रक्रिया आता मराठा आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर थांबविण्यात आली आहे. सप्टेंबर उजाडला तरी प्रवेशच नाहीत तर शैक्षणिक वर्ष सुरू कधी होणार? अभ्यासक्रम शिकवून पूर्ण कधी होणार आणि पुढील महत्त्वाचे वर्ष असलेल्या बारावीची तयारी कधी करणार? अशा अनेक प्रश्नांनी विद्यार्थ्यांसह पालकही चिंतित आहेत.यंदा कोरोनामुळे उशिरा सुरू झालेल्या अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी मराठा आरक्षणाच्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाने थांबविली आहे. शासन स्तरावरून यासंदर्भातील निर्णय झाल्यानंतरच अकरावी आॅनलाइन प्रवेशाची पुढील कार्यवाही जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.अकरावीचे वर्ष उशिराने सुरू झाल्याने किती अभ्यासक्रम शिकविला जाईल? बारावीच्या वर्षात आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमांचे काय, त्याविषयीही कोणताच आराखडा शिक्षकांच्या हाती आलेला नाही. त्यामुळे अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा आणि किती, असे प्रश्न शिक्षकांनाही सतावत आहेत. या पार्श्वभूमीवर हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र ई मेल केले असून यात लक्ष घालून प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली आहे.शासनस्तरावरून येत्या २ ते ३ दिवसांत मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यानंतर अकरावी प्रवेशात ते लागू करून प्रवेशाची पुढील कार्यवाही लवकरच सुरू केली जाईल.- दिनकर पाटील, संचालक, शिक्षण संचालनालय
शैक्षणिक वर्ष सुरू कधी होणार?, अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 6:32 AM