मुंबई :- ताज महल हॉटेलच्या समोर गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात भरभरून कचरा टाकतानाच धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला होता. कचरा टाकतानाचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालिकेने संबंधितांचा शोध घेतला आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच टॅक्सी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या कारवाईचे स्वागत करताना मच्छिमारांनी अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित करत कारवाई फक्त गरिबांवरच का? एम.आय.डी.सी मधील बड्या रासायनिक कंपन्याच्या विरोधात अशी कारवाई केव्हा होणार असा सवाल प्रशासनाला केला आहे.
पालघर आणि रायगड मधील एम.आय.डी.सी मधील कार्यरत रासायनिक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात दूषित सांडपाणी ऊपचारा विना सोडले जात असल्यामुळे आज सर्व खाड्या मेल्या असून ह्या खाड्यातील सामुद्रिक जैवविविधतता संपुष्टात आली आहे आणि त्याला कारणीभूत असणाऱ्या बद्द्या कंपन्यांवर कारवाई होत नसल्याने आज ही विपरीत परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी केला.
मुंबई महानगर पालिकेने जेजे परिसरात राहणाऱ्या या नागरिकाला थोठवलेले दंड आणि पोलिसांनी त्याला शोधून दाखल केलेले गुन्हे यापेक्षा सर्वात मोठे गुन्हेगार रासायनिक कंपन्यांचे मालक आहेत. या बेजबाबदार मालकांना दंड ठोठावून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सर्वत्र होत असताना प्रशासनाकडून काहीच कारवाई होत नसल्याने प्रशासनातील कर्मचारी हे जनतेचे सेवक आहात की या रासायनिक कंपन्यांच्या मालकांचे गुलाम आहेत असा प्रश्न तांडेल यांनी उपस्थित केला आहे
रासायनिक सांडपाणी आणि कचरा या दोन्हींचे मिश्रण सागरी प्रदूषणास कारणीभूत आहे. जेव्हा रसायने आणि कचरा समुद्रात सोडला जातो अथवा जाणूनबुजून समुद्रात टाकला जातो तेव्हा सागरी प्रदूषणाची क्रिया घडते. महासागरातील प्रदूषणाची अनेक कारणे आहेत, परंतु आपल्या महासागरातील बहुतेक प्रदूषण (८०%) मानवांमुळे होते.
सागरी प्रदूषणाची काही प्रमुख कारणे म्हणजे नॉनपॉइंट सोर्स पोल्युशन म्हणजे लहान स्त्रोतांकडून होणारे प्रदूषण ज्याला अचूकपणे ठरवता येत नाही. उदाहरणांमध्ये वैयक्तिक कार, बोटी, शेतजमीन आणि बांधकाम साइट्सद्वारे निर्माण होणारे प्रदूषण समाविष्ट आहे. तसेच हेतुपुरस्सर डिस्चार्ज हा जाणीवपूर्वक सोडला जाणारा घाण कचरा असून जगातील अनेक क्षेत्रांतील उत्पादन प्रकल्प पारासह विषारी कचरा समुद्रात सोडला जातो. प्लास्टिक कचरा हे विशेषतः कठीण आव्हान आहे; महासागर संवर्धनानुसार, दरवर्षी आठ दशलक्ष मेट्रिक टन प्लास्टिक आपल्या महासागरात जाते. तेल गळती सामुद्रिक प्रदूषणाचे मोठे स्तोत्र असून कच्चे तेल वर्षानुवर्षे समुद्रात टिकून राहते आणि ते स्वच्छ करणे कठीण असते.
सामुद्रिक प्रदूषण सागरी प्रजातींसाठी हानिकारक असून सागरी प्राणी सागरी प्रदूषणाला वारंवार बळी पडतात. तेल गळतीमुळे सागरी जीवनाचा गिलांमधून अडकवून त्यांचा जीव गुदमरतो. तसेच समुद्री जीव अन्न म्हणून लहान प्लास्टिक खातात ज्यामुळे माश्यांच्या पोटातून प्लास्टिकच्या पिशव्या अनेकदा मासेमारीच्या जाळ्यांमध्ये आढळून आहे आहेत. महासागरातील प्लॅस्टिकच्या कचर्यामुळे सर्वात असुरक्षित असलेल्या प्राण्यांमध्ये डॉल्फिन, मासे, शार्क, कासव, समुद्री पक्षी आणि खेकडे यांचा समावेश होतो.
लहान सामुद्रिक जीव प्रदूषण विरहित विषारी पदार्थ खातात आणि त्यांना मोठे मासे खातात, त्यापैकी बरेच सीफूड आहेत जे आपण शेवटी खातो. जेव्हा दूषित प्राण्यांमधील विषारी द्रव्ये मानवी ऊतींमध्ये जमा होतात, तेव्हा ते दीर्घकालीन आरोग्य स्थिती, कर्करोग निर्माण करण्यासाठी कारणीभूत होतात. महासागरातील बर्याच वर्षांपासून साठलेल्या अतिरिक्त मलबा समुद्रातील ऑक्सिजनची पातळी कमी करण्यास कारणीभूत आहे, परिणामी महासागरात कमी ऑक्सिजन होते. महासागरातील ऑक्सिजनच्या कमी पातळीमुळे पेंग्विन, डॉल्फिन, व्हेल आणि शार्क यांसारख्या महासागरातील प्राण्यांचा मृत्यू होतो अशी माहिती देवेंद्र तांडेल यांनी दिली.