केव्हा मिळणार ॲडमिशन?; दुसऱ्या गुणवत्ता यादीत १८ हजारांना पहिल्या पसंतीचे कॉलेज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 07:33 AM2023-07-04T07:33:08+5:302023-07-04T07:33:25+5:30
अकरावी प्रवेश
मुंबई : दहावीचा निकाल लागून आता एक महिना झाला तरी प्रवेश प्रक्रियेने वेग पकडलेला नाही. पहिल्या यादीत ज्यांना मनासारखे कॉलेज मिळाले नाही, त्यांनी दुसऱ्या यादीची वाट पाहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अकरावी प्रवेशाची दुसरी यादी सोमवारी जाहीर झाली. ७५ हजार ८९६ पैकी १८ हजार ७०२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. कट ऑफ अजूनही ८५ ते ९४ टक्क्यांदरम्यान असला तरी त्यात एक ते दोन टक्क्यांची घसरण झाली आहे.
मुंबईतील एचआर महाविद्यालय, सेंट झेविअर्स, केसी या नामांकित कॉलेजांच्या वाणिज्य शाखेचा कट ऑफ ८५ ते ९४ टक्क्यांदरम्यान स्थिर दिसून आला. दुसरीकडे कला शाखेच्या कट ऑफमध्ये १ ते २ टक्क्यांची घसरण असली तरी हा कट ऑफ ९२ ते ९४ टक्क्यांमध्ये स्थिरावल्याचे दिसून आले. विज्ञान शाखेच्या कट ऑफमध्येही १ ते २ टक्के घसरण दिसून आली. मिठीबाई महाविद्यालय, वझे केळकर, रुपारेल, डहाणूकर या महाविद्यालयांच्या कट ऑफमध्येही पहिल्या यादी पेक्षा एकही विशेष घसरण दिसून आली नाही. त्यामुळे ८५ टक्क्यांखालील विद्यार्थ्यांना पसंतीचे व नामांकित महाविद्यालय मिळवण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
५ जुलैपर्यंत प्रवेश निश्चिती करा
विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन कोणते कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले की नाही, हे पाहता येणार आहे. दुसऱ्या प्रवेश यादीतील पात्र विद्यार्थ्यांना ३ ते ५ जुलै या कालावधीत प्रवेश निश्चित करत येणार आहे.
कट ऑफमधील चढ-उतार
महाविद्यालयाचे कट ऑफ हे पहिल्या गुणवत्ता यादीतच नव्वदीपार गेलेले पाहायला मिळाले. सेंट झेविअर्स, जय हिंद, पोदार, केसी, साठ्ये, डहाणूकर अशा सर्व नामांकित महाविद्यालयांच्या कट ऑफमध्ये दुसऱ्या गुणवत्ता यादीत फक्त १ ते २ टक्क्यांची घसरण झाल्याने ८० ते ८५ टक्के असणाऱ्या विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. दुसरीकडे सेंट झेविअर्स, केसी, जय हिंद, साठ्ये, डहाणूकर, भवन्स, सीएचएम महाविद्यालयाच्या वाणिज्य कट ऑफमध्ये फारसा बदल नाही. मिठीबाई, रुईया महाविद्यालयाच्या कला शाखेत ही बदल दिसून आला नाही.