Join us

व्यक्तिद्वेषी राजकारणाचा राज्यात अंत कधी होणार? राज्यातील राजकीय वातावरणावर नेत्यांची संवेदना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 9:53 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक मतभेद जरुर होते. मात्र, व्यक्तिद्वेषाला थारा नव्हता. परस्परांवर टीकास्त्र सोडणारे विरोधक एकत्र भेटल्यावर त्यांच्यात वैरभाव नसायचा

‘पंचवीस वर्षांची मुंबई’ विशेषांकाचे प्रकाशन  मुंबई :

महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक मतभेद जरुर होते. मात्र, व्यक्तिद्वेषाला थारा नव्हता. परस्परांवर टीकास्त्र सोडणारे विरोधक एकत्र भेटल्यावर त्यांच्यात वैरभाव नसायचा. मात्र, गेल्या काही काळात व्यक्तिद्वेषाने राज्याचे राजकारण पोखरले असून, राजकारणाचा हा विखारी पोत संपुष्टात येणार की नाही?, असा सवाल करीत त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवे, अशी भावना राज्य मंत्रिमंडळातील मातब्बर मंत्री, विरोधी पक्षाचे नेते यांच्यासह विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनीही बुधवारी व्यक्त केली.

मुंबई ‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘पंचवीस वर्षांची मुंबई’ या गेल्या २५ वर्षांच्या मुंबईतील बदलांचा सखोल आढावा घेणाऱ्या विशेषांकाचे बुधवारी विधान भवनातील सेंट्रल हॉलमधील दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन झाले. त्यावेळी लोकशाहीच्या या विश्वस्ताला साक्षी ठेवून सर्वपक्षीय मातब्बर मंडळींनी महाराष्ट्रातील सध्याचे आरोप-प्रत्यारोपांनी गढूळलेले वातावरण बदलण्याचा निर्धार बोलून दाखविताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले.

राजकारणातील प्रतिस्पर्ध्यांबाबत एकेकाळी असलेले प्रेम आता दिसत नाही, अशी खंत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. राजकीय अभिनिवेशामुळे लोकांच्या मनात राजकीय नेत्यांबाबत घृणा निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. सभापती रामराजे निंबाळकर यांनीही याच भावनांशी सहमती दाखविली. आपापली राजकीय विचारसरणी काहीही असली तरी परस्परांचा आदर केला पाहिजे. ‘लोकमत’ने राजकारणातील वातावरण बिघडू नये याकरिता वर्तमानपत्राच्या माध्यमातून कायम अंकुश ठेवला पाहिजे, असे ते म्हणाले.

‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा म्हणाले, समाजातील मोठा घटक असंवेदनशील बनला व सहनशक्ती हरवून बसला आहे, ही आजची खरी समस्या आहे. संकुचित विचारांचा त्याग करून व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. अन्य माध्यमांवर लोकांचा विश्वास नाही. मात्र, वृत्तपत्रांवर आजही लोकांचा विश्वास आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा म्हणाले की, ‘लोकमत’ने कायम स्थानिक बातम्यांना व ‘हार्ड हिटिंग स्टोरीज’ना प्राधान्य दिल्याने हे जनसामान्यांचे मुखपत्र बनले आहे. मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी विशेषांकाच्या निर्मितीमागील उद्देश स्पष्ट केला. ‘लोकमत’च्या विशेषांकाकरिता लेखन केलेल्या मोहसिना मुकादम, सुहास बहुळकर, नितीन वैद्य, राजीव खांडेकर, दिलीप ठाकूर, राम दुतोंडे, शारदा साठे, प्रशांत दळवी व अनु मलिक यांचा सत्कार करण्यात आला. विशेषांकची सुबक सजावट करणारे विवेक रानडे व गजानन इंगळे यांचा, तर संपादकीय कामाकरिता संजीव साबडे व पवन देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय भुस्कुटे यांनी केले.

कुणीही उठावे व कुणावरही बोलावे, असे वातावरण नव्हतेमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, विधिमंडळात १९८५ मध्ये जेव्हा आपण पाऊल ठेवले तेव्हा विरोधी बाकावर अनेक मातब्बर मंडळी होती. त्यांचे भाषण ऐकण्याकरिता सभागृहात गर्दी व्हायची. आतासारखे कुणीही उठावे व कुणावरही बोलावे, असे वातावरण नव्हते. मुख्यमंत्री पदाचा सन्मान राखला जात होता. सत्ताधारी व विरोधक यांच्यात व्यक्तिद्वेष नव्हता.

स्मरणशक्ती अल्पकालीन असल्याचा गैरफायदा घेतला जाताेसार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, मुंबईच्या जडणघडणीत सर्वपक्षीय सरकारांचे योगदान आहे. लोकांची स्मरणशक्ती अल्पकालीन असल्याचा गैरफायदा घेतला जात आहे. खालच्या सभागृहांमध्ये आपण आमने-सामने असतो. परंतु, हा सेंट्रल हॉल आहे. येथे आपण एकत्र आहोत. येथे ‘सामना’ नकोच, असा चिमटा त्यांनी भाजपच्या आशिष शेलार यांना काढला. 

लाेकांना काय वाटते ते जास्त महत्त्वाचे मुंबई चांगली की वाईट हा प्रश्न नाही. काळाच्या ओघात मुंबई स्वत:ला बदलून आपले अस्तित्व टिकवून ठेवत आहे. १९५६ पासून मुंबई पाहत आहे. मुंबईत चुटकी वाजली तरी महाराष्ट्रात त्याचा आवाज ऐकू येतो. सर्वसामान्य माणसाला पुढील २५ वर्षांत कशी मुंबई हवी आहे, हे त्याला विचारा. पुढच्या वेळी त्याला व्यासपीठावर बसवून बोलते करा. आम्ही समोर बसतो. सर्वसामान्य माणसाला अभिप्रेत मुंबई कशी घडावी, याचा वेध घेण्याची गरज आहे. मुंबई, ठाणे, नाशिक व पुणे ही चार शहरे महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यावर प्रभाव टाकतात. मुंबईसमोर अनेक समस्या असून त्या सोडवण्याकरिता सर्वांनी एकत्र यायला हवे. राजकारण निवडणुकीत करू, पण शहराच्या हिताकरिता सर्वांनी एकत्र आले पाहिजे. लोकमतने सर्वसामान्य मुंबईकरांना बोलते करावे व शहराच्या विकासाकरिता राजकीय पक्षांना एकत्र करावे. आपण साऱ्यांनी मिळून मुंबईला न्यूयॉर्कच्या पुढे न्यायचे आहे. मुंबई कशी घडावी, याचा वेध घेणं गरजेचं आहे. मुंबईचे प्रश्न सोडवायचे असतील तर सर्व पक्षांचं एकमत होणं गरजेचं आहे. - रामराजे नाईक, सभापती, विधान परिषदकुणीही उठताे आणि कुणावरही बाेलताे...सह्याद्रीच्या रांगांमधील गावातील अनेकजण पोटाच्या भुकेमुळे या शहरात आले व त्यांच्या कुटुंबाचा मुंबईत विकास झाला. अशाच पद्धतीने उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश वगैरे भागातून आलेल्यांनाही या शहराने रोजगार दिला व त्यांचे आयुष्य घडवले. विलासरावांच्या काळात फ्री-वे सुरू झाला, तर अशोक चव्हाण यांच्या कार्यकाळात सी-लिंक सुरू झाला. १९८५ ला जेव्हा विधानसभेत पाऊल ठेवले, तेव्हा मातब्बर नेते विरोधी बाकांवर होते. त्यांचे भाषण सुरू होताच सदस्य सभागृहात गर्दी करीत. सभागृहाचा तो दर्जा व आताचा दर्जा यातही अंतर पडले आहे. आता कुणीही कुणावरही काहीही बोलतो. इतकी घसरण झाली आहे. ही घसरण परवडणारी नाही. मुख्यमंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तीचा सन्मान राखण्याची महाराष्ट्राची पद्धत राहिली आहे. ‘लोकमत’ने या बदललेल्या परिस्थितीवर टीकेची झोड उठवली पाहिजे. वैचारिक टीका करणारे विरोधक पूर्वी एकत्र आल्यावर चहापान करायचे, गप्पागोष्टी करायचे. वागण्यात व्यक्तिद्वेष नव्हता. हा बदल रोखला पाहिजे.- बाळासाहेब थाेरात, महसूल मंत्रीपब्लिक मेमरी शॉर्टचा गैरफायदा घेतला जाताे आशिष शेलारांचं भाषण ऐकल्यावर २९३ चा ठराव आला की काय, असं वाटलं. सभागृहाचा परिणाम. कधी सत्ताधारी, तर कधी विरोधी बाकावर बसायला लागणार, हे लोकशाहीत चालत राहते. मात्र, दोन्हीकडील मंडळी खऱ्या अर्थाने लोकमताच्या आधारावर इथे बसतात. आम्ही पाच वर्षांत अमूक केलं असे सांगता, मग पन्नास वर्षांत आम्ही काय केलं याचा विचार करत होतो. पब्लिक मेमरी शॉर्ट असल्याचा गैरफायदा उठवला जात आहे.  महाराष्ट्र व मुंबईच्या  जडणघडणीत ज्यांनी ज्यांनी राज्य केलं, त्या सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे. सर्वांत मोठं योगदान स्वातंत्र्य सैनिक आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांचं आहे.  मुंबईबद्दल राजकारण, समाजकारण, चित्रपट, नाट्य, व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रातील मंडळींना आकर्षण आहे. कारण मुंबईनं सगळ्यांना सामावून घेतलं. हे शहर कुणाला उपाशी ठेवत नाही.  सातत्याने मुंबई बदलतीय, गर्दी वाढतेय. ‘लोकमत’ने आपले वृत्तपत्रीय स्वातंत्र्य अबाधित ठेवले. निष्पक्ष बातम्या दिल्या. हेच लोकमतचे बलस्थान आहे. - अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री  'ट्रोलिझम्'चे आज देशापुढे माेठे आव्हानस्वातंत्र्य पूर्व काळात ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी लोकमत यवतमाळमध्ये जन्माला आला होता. नागपूर लोकमतची ५० वर्षे, मुंबईची २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मी विचार करतो की, लोकमतने काय दिले? तेंव्हा जाणवते लोकमत हा सर्वसामान्य जनतेचा आवाज बनला. राज्यात विविध पक्षांचे नेते घडवण्यात लोकमतचा वाटा आहे. लोकमतचे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांनी, मी कोणत्या पक्षाचा, विचारधारेचा आहे याचा वृत्तपत्राशी संबंध नाही. हे वृत्तपत्र लोकांचे आहे आणि तुम्ही त्याचे विश्वस्त आहेत, हे वारंवार बिंबवले होते. गेली तीन दशके लोकमत महाराष्ट्रात नंबर एकचे वृत्तपत्र बनले आहे. आज भारतीय समाजासमोर, वृत्तपत्रांसमोर सर्वात मोठे आव्हान कोणते असेल तर ते 'ट्रोलिझम्'चे आहे. त्यामुळे आपल्या व्यवस्था बिघडू लागले आहेत. टाॅलरन्स कमी झाला आहे, संकुचितपणे पाहू लागलो आहोत. टीव्ही, सोशल मीडियाच्या काळात वृत्तपत्रांवरचा विश्वास अढळ आहे. लोकमत परिवार सर्वधर्मसमभाव मानणारा आहे. - विजय दर्डा, चेअरमन, लाेकमत एडिटोरियल बोर्ड  जनसामान्यांचे मुखपत्र हाेत लोकांचे प्रश्न मांडले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रेरणेने १ मे १९९८ साली मुंबईत लोकमत सुरू झाला. उंच इमारती आणि बकाल वस्त्या एकाच वेगाने वाढत होत्या. जुने उद्योग मुंबई, ठाण्याबाहेर जात होते आणि नव्या उद्योगांना परवानगी नव्हती. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई आपली कुस बदलत होती. या अडचणीच्या काळात लोकमतने मुंबईतील आपला प्रवास सुरू केला. आपल्या पहिल्या अंकापासून लोकमतने कायमच स्थानिक बातम्यांना प्राधान्य दिले. हार्ड हिटिंग बातम्या हे आमचे वैशिष्ट्य राहिले आहे. राज्याच्या विविध भागातून मुंबईत आलेल्या मराठीजनांनी सुरुवातीपासूनच लोकमतला भरभरून प्रेम दिले. लोकमतने केवळ खपच वाढविला नाही तर जनसामान्यांचे मुखपत्र म्हणून लोकांचे प्रश्न धडाडीने मांडले. आज लोकमत सखी-मंचची सदस्य संख्या आज लाखात गेली आहे. मुंबई लोकमतने महाराष्ट्रायीन ऑफ द इयर, डिजिटल इन्फ्ल्युएंसर, इन्फ्रा काॅन्कक्लेव्हचे आयोजन केले. गेल्या वर्षी कोरोना काळात ६१ हजार बाटल्या रक्तसंकलन केले. - राजेंद्र दर्डा, एडिटर इन चिफ, लोकमत समूह एकटा पक्ष, नेता काही करू शकत नाही...इथे सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी भाषणे केली. सर्व पक्षांनी जीवनविद्या मिशनचे काम जाणले आणि ते सर्व आम्हाला मदत करत असतात. त्यामुळे मी इथे सर्वपक्षीय आहे. पण, माझे विषय राजकीय नाहीत. लोकमत आणि जीवनविद्या मिशन ही युती स्ट्राँग होत गेली. लोकमत आणि जीवनविद्या मिशन यांचे एकमत झाले तर जगाला फायदा होईल, असे सद्गुरू वामनराव पै म्हणाले होते. माणसाच्या मनांचे पूल जोडायची गरज आहे. हेच काम जीवनविद्या मिशन करत आहे. गावे दत्तक घ्यायची, तिथे सुसंस्कृत मनांची घडण, निर्व्यसनी समाज, स्त्री सन्मानाची जाणीव, स्वच्छता, पर्यावरण जोपासना आदी आघाड्यांवर जीवनविद्या मिशन काम करत आहे. सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीसाठी संकुचित वृत्ती सोडावी लागेल. राजकारण असो किंवा समाजकारण, मी आणि माझे कुटुंब याच्यापुढे आपण जात नाही. स्वत:चा विचार करा, पण स्वत:चा विचार करताना इतरांचा विचार करायलाही शिका. मी काही सर्वांना फक्त त्याग करायला सांगत नाही. आधी तू सुखी हो, मग इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न कर, हीच सद्गुरू वामनराव पै यांची शिकवण होती. सर्वांमुळे मी ही संकल्पना समाजात रूजवायला हवी. एकटा माणूस, एकटा पक्ष किंवा एकटा नेता काही करू शकत नाही. कार्यकर्ते, समाज यांच्यामुळेच तो पुढे जात असतो. सर्वांमुळे मी आहे, हे तत्त्वज्ञान रुजवणे गरजेचे आहे. सर्वांनी सुसंस्कृत समाज घडवायचा प्रयत्न केल्यास भारत देश महासत्ता बनायला वेळ लागणार नाही.  या विशेष अंकातला माझा लेख जरुर वाचा. - प्रल्हाद पै, विश्वस्त, जीवनविद्या मिशनखुलेपणा गेला, कोंदटपणा वाढलामागील २५ वर्षांत मुंबईने काय कमावले आणि गमावले याची यादी काढली तर मुंबईने गमावल्याची यादी मोठी आहे. सतत बदलणारी, गतिमान अशा मुंबईला सिंहावलोकनाची सवय नाही. पण, ‘लोकमत’ला त्याची गरज वाटली याबद्दल ‘टीम लोकमत’चे अभिनंदन. मुंबईची गती इतकी वेगाने वाढतेय की कुणीतरी कुठेतरी अडकला, लटकला, मेला त्याचे किंचाळणे मागे सुटून जाते. याचा अर्थ मुंबई असंवदेनशील आहे, असे नाही. पण मुंबईची गती ते आक्रोश आणि किंकाळ्या मागे सोडायला लावते. सर्व क्षेत्रांचा मिळून लसावि आणि मसावि केल्यावर ‘मुंबईतला खुलेपणा गेला, कोंदडटपणा वाढला’ याची जाणीव होते. उत्साहाने भारलेले लोकसहभाग असलेले सण ही मुंबईची ओळख होती. चाळीत, वस्तीत लोकसहभागातूनच आरास, नाटक, कलांची जपणूक व्हायची. सणांमधला असा खुलेपणा, लोकसहभाग कमी झाला आणि कोंदटपणा वाढला. विकासाच्या गतीने कमावले आणि भावना संस्कृती सामूहिकतेच्या दृष्टीने गमावले, अशी मुंबईची स्थिती आहे. - आ. आशिष शेलार, माजी शिक्षणमंत्रीआमचा महापौर हाेता तर मुंबई बुडाली नाही मुंबईत आमच्या सगळ्यांच्या आवडत्या ‘लोकमत’ला २५ वर्षे पूर्ण झाली.  जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन, जनतेचा आरसा बनून ‘लोकमत’ने दिमाखाने काम केले. दिवंगत राजीव गांधी यांच्या काळात स्वतंत्र आणि स्वायत्त माध्यमांना प्रोत्साहन देण्यात आले. त्यासाठी त्यांनी घटना दुरूस्ती केली. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याइतके लोकशाहीवादी नेतृत्व दुसरे कोणते नव्हते. पंडित नेहरु हे स्वत:च पेपरला विरोधात बातमी द्यायचे. जनमत काय आहे, हे जाणून घ्यायचे.  अलीकडे तो काळ राहिलाच नाही. ‘लोकमत’ने जनतेची भूमिका मांडली. अलीकडेच ‘नागपूर लोकमत’ला ५० वर्षे पूर्ण झाली. विदर्भात सुरू झालेले हे वृत्तपत्र राज्यभर पसरले. गावखेड्यापर्यंत पोहोचले. त्या माध्यमातून राज्यात गावपातळीपर्यंत काय चालू आहे, हे मांडण्याचे काम ‘लोकमत’ने प्रामाणिकपणे केले. मुंबईत पूर्वी खूप पाऊस पडायचा. कितीही पाऊस झाला तरी मुंबई पाण्यात जायची नाही. काँग्रेसचा महापौर होता, तोपर्यंत मुंबई कधीच पाण्यात बुडाली नाही.- नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्षराजकारण्यांबद्दल घृणा निर्माण झालीयमुंबई हे माणसे जोडणारे शहर आहे. मुंबई शहर सात बेटे जोडून निर्माण झाल्यामुळे कदाचित हे शहर माणसे जोडत असेल. मुंबई कुणाला खाली पडू देत नाही आणि मेहनत करणारा या शहरात उपाशी झोपत नाही. मुंबई महाराष्ट्राला मिळाली यामध्ये इंदिरा गांधी यांचे मोठे श्रेय आहे, याचा आपल्याला विसर पडला आहे. लोकमत हे सर्व समाजघटकांना जोडणारे वृत्तपत्र असून, वृत्तपत्राचे महत्त्व संपू शकत नाही. राजकारणात एकेकाळी प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यांबद्दल प्रेम, आदरभाव होता. शरद पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांची सुरक्षा व्यवस्था पवार यांनी तिप्पट वाढवली होती. सध्या ज्या पद्धतीचा राजकीय अभिनिवेश दिसतो, त्यामुळे लोकांच्या मनात राजकारण्यांबद्दल घृणा निर्माण झाली आहे. राजकारणात वेगवेगळ्या पदांवरील व्यक्तींचा सन्मान राखला पाहिजे. मुंबई शहरातील अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्व चाळीतून उभी राहिली. मुंबईला वेगवेगळ्या मार्गाने कनेक्टिव्हिटी निर्माण केली तरच मुंबई भविष्यात टिकेल. - जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्रीत्याचा सगळा हिशेब ऑक्टोबरमध्ये हाेईलइलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियाच्या काळातही लोकमतने आपले वेगळेपण आणि महत्त्व टिकवून ठेवले आहे. माध्यमांकडे देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहिले जाते. सध्या कुठेतरी या स्तंभाची विश्वासार्हता कमी झाल्यासारखे वाटते. लोकमत हा त्याला सन्माननीय अपवाद आहे. काही पेपर याचे, काही त्याचे असे आपल्याला दिसते. पण, लोकमत वाचला, त्यातल्या बातम्या पाहिल्या तर लोकमत हा कुणा एकाचा पेपर आहे, असे म्हणता येणार नाही. लोकमतमधील बातम्या पाहिले की ही बाब सहज लक्षात येते.  सर्वसामान्य मुंबईकरांचे प्रश्न उचलणारे हे वृत्तपत्र आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न आपल्या बातम्यांमधून त्यांनी मांडले. सर्वसामान्यांशी निगडित घटना, सर्वसामान्यांची सुखदुःखे मांडायचे काम लोकमतने सातत्याने केले आहे. इथे काही वक्त्यांनी मुंबईला आम्ही काय दिले, मुंबई महापालिकेत काय केले याची मांडणी केली. त्याचा लेखाजोखा मांडण्याची ही वेळ नाही. त्याचा हिशेब ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणुकीत नक्की होईल. - असलम शेख, वस्त्रोद्योग मंत्री २५ वर्षांतील आव्हानांची चर्चा हवीलोकमत हे स्पष्टपणे भूमिका मांडणारे वृत्तपत्र आहे. २५ वर्षांत मुंबईत काय बदल झाले याचबरोबर गेल्या ६० ते ६५ वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रातील परिस्थितीवर विचारमंथन व्हायला हवे. तसेच पुढील २५ वर्षांत महाराष्ट्रासमोर काय प्रश्न राहतील, याचाही विचार व्हायला हवा. - दिलीप वळसे - पाटील, गृहमंत्रीविधिमंडळात झालेला पहिलाच कार्यक्रम 'पंचवीस वर्षांची मुंबई' या विशेष अंकाच्या निमित्ताने एक ऐतिहासिक दस्तावेज तयार करण्यात आला. ज्याचे प्रकाशन तेवढेच ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या वास्तूत व्हावे, अशी कल्पना लोकमतने मांडली. स्वत:चे वेगळे महत्त्व असणाऱ्या विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात या अंकाचे प्रकाशन करण्याच्या कल्पनेला सभापती रामराजे निंबाळकर यांनी क्षणाचाही विलंब न करता परवानगी दिली. दि. १५ जून रोजी या विशेष अंकाचे प्रकाशन विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये झाले. एक वेगळा इतिहास त्यातून रचला गेला आहे. विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या वर्तमानपत्राने काढलेल्या अंकाचे विमोचन झाले आहे. पंचवीस वर्षांचा इतिहास शब्दबद्ध करताना त्याच्या प्रकाशन सोहळ्याने देखील एका आगळ्या इतिहासाची नोंद केली आहे.

 

टॅग्स :मुंबईराजकारण