बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 04:43 PM2024-06-18T16:43:31+5:302024-06-18T16:43:53+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजन सोहळा ३१ मार्ज २०२१ रोजी पार पडला होता.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे बांधकाम पूर्ण होत आले आहे. येत्या जुलैपर्यंत ते पूर्ण होईल. गेले ३ महिने येता आले नाही. आपल्याकडे बाळासाहेबांच्या आठवणी असतील त्या आणून द्याव्यात, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
किती टक्के काम झाले हे सांगणार नाही. अजून बारीकसारीक गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. २३ जानेवारी पर्यंत या स्मारकाचे लोकार्पण करू, असे ठाकरे यांनी जाहीर केले. तसेच जे जे बाळासाहेबांच्या सानिध्यात होते, त्यांच्या आठवणी या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. उद्या वर्धापण दिन आहे, तेव्हा बाकीचे बोलेन असे ठाकरे म्हणाले.
शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजन सोहळा ३१ मार्ज २०२१ रोजी पार पडला होता. मुंबईतील वास्तुविशारद आभा लांबा यांनी आराखडा बनविला आहे. या स्मारकामध्ये बाळासाहेबांच्या बऱ्याच गोष्टींचा समावेश असणार आहे. यात स्मारकाची इमारत तर वैशिष्ट्य असेलच पण यासोबतच बाह्य सजावट, बागबगीचा, रेनवॉटर हार्वेस्टिंग, लेझर शो, डीजिटल पद्धतीनं गोष्टी सांगणे अशा सुविधा देखील असणार आहेत. टाटा प्रोजेक्ट लिमिटेड ही कंपनी हे स्मारक बांधत आहे.
महापौर बंगल्याचा जीर्णोद्धार आणि संग्रहालय
पहिला टप्पा २५० कोटी रुपयांचा आहे. यात एंट्रन्स ब्लॉक, आर्टिस्ट सेंटर, इंटरप्रिटेशन सेंटर, हेरिटेज कॉन्झर्वेशन, महापौर बंगल्याचा जीर्णोद्धार, संग्रहालय आणि लँडस्केपिंगमध्ये संवर्धन, परिसराचे सुशोभीकरण यांचा समावेश आहे.
दुसरा टप्पा प्रस्तावित
स्मारकाचा दुसरा टप्पा १५० कोटींचा आहे. यात तंत्रज्ञान, लेसर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथन, कथाकथन, फिल्म, संग्रहालय कथनातील ऑडिओ व्हिज्युअल आणि तांत्रिक घटकांचा समावेश आहे.