सीईटीचे वेळापत्रक कधी येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:06 AM2021-07-28T04:06:21+5:302021-07-28T04:06:21+5:30

बारावीच्या निकालासोबत विद्यार्थ्यांना वेळापत्रकाचीही पाहावी लागतेय वाट लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती काही प्रमाणात नियंत्रणात ...

When will the CET schedule come? | सीईटीचे वेळापत्रक कधी येणार?

सीईटीचे वेळापत्रक कधी येणार?

Next

बारावीच्या निकालासोबत विद्यार्थ्यांना वेळापत्रकाचीही पाहावी लागतेय वाट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येत आहे. बारावीचा निकालही येत्या काही दिवसांत जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने परीक्षांच्या तारखा आणि वेळापत्रक लवकर जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत आहे.

सीईटी सेलकडून बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी अर्ज नोंदणीची मुदत संपली आहे. मात्र, अद्याप त्या परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत माहिती देण्यात न आल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.

बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, कृषी आणि इतर विद्या शाखांच्या प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य आहे. यंदा एकूण ४ लाख ६ हजार ६७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा ऑगस्टमध्ये होईल अशी अपेक्षा होती. मात्र, जुलै संपत आला तरी अद्याप परीक्षांचे वेळापत्रक नसल्याने विद्यार्थी, पालकांना सीईटी परीक्षा आणखी लांबणार का, अशी भीती वाटू लागली आहे. परीक्षा लांबल्यास पुढील प्रवेश प्रक्रियेलाही उशीर होऊन शैक्षणिक वर्ष लांबण्याची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आणि त्यासंदर्भातील सूचना लक्षात घेता सीईटी परीक्षा लवकर होऊन प्रवेशाचा मार्ग मोकळा व्हावा, अशी इच्छा विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.

आधी कोरोना आणि आता राज्यातील पूरपरिस्थिती यामुळे सीईटी परीक्षेच्या नियोजनात काही अडथळे येत असल्याची माहिती मिळत आहे. पुढील आठवड्यापर्यंत या परीक्षेबाबत स्पष्टता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बारावीच्या निकालाचीही तारीख ठरेना

बारावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात असून, राज्य शिक्षण मंडळ स्तरावर त्यावर काम सुरू असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. मात्र, निकाल जाहीर होण्याची निश्चित तारीख सांगू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निकाल वेळेत लागावा यासाठी मंडळाकडून प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: When will the CET schedule come?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.