मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्री आरेतील पर्यावरणप्रेमींना कधी भेटणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 04:56 AM2020-01-30T04:56:01+5:302020-01-30T04:56:35+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिला निर्णय हा आरे संदर्भात दिला होता.

When will the Chief Minister and Environment Minister meet the environmentalists in the arena? | मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्री आरेतील पर्यावरणप्रेमींना कधी भेटणार?

मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्री आरेतील पर्यावरणप्रेमींना कधी भेटणार?

Next

मुंबई : गतवर्षी आरे कॉलनीतील मेट्रो ३च्या कारशेड डेपोचा वाद चांगलाच रंगला होता, परंतु महाआघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर आरेच्या बाजूने मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिल्यानंतर वाद मिटला. पर्यावरणप्रेमींना भेटून कारशेड डेपोसंदर्भात तोडगा काढू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पण अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे पर्यावरणप्रेमींना भेटलेले नाहीत. म्हणून आरेतील पर्यावरणप्रेमींना मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्री कधी भेटणार, असा सवाल पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिला निर्णय हा आरे संदर्भात दिला होता. त्यामुळे अजूनही पर्यावरणप्रेमींचा मुख्यमंत्र्यांवर भरोसा आहे. महाआघाडी सत्तेत आल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे बरेच प्रयत्न केले गेले, परंतु ते अद्यापही भेटलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी कारशेडच्या कामावर स्थगिती आणली, तरीही तिथे रॅम्पचे काम सुरू आहे. आता आमची एकच मागणी आहे की, कारशेडच्या जागेची पाहणी करावी आणि जैवविविधतेची किती हानी झाली आहे, याची पडताळणी व्हावी. तसेच किती झाडे तोडली गेली त्याचा आढावा घेऊन त्या मोकळ्या
जागेवर रोपांची लागवड करायची आहे.

याशिवाय आरेच्या जंगलाचे संवर्धन करायचे आहे. यासंदर्भात पर्यावरणप्रेमी व मुंबईकरांना चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि पर्यावरणमंत्री यांच्याशी एक बैठक घेऊ इच्छितात, अशी माहिती पर्यावरणप्रेमी हर्षद तांबे याने दिली. देवेंद्र फडणवीस सरकारविरुद्ध आमची नाराजी होती. कारण ते कधीच कारशेडच्या विषयावर बोलायला तयार नव्हते, परंतु महाआघाडीच्या सरकारने एकदा तरी पर्यावरणप्रेमींना भेटून त्यांच्याशी संवाद साधावा, अशी अपेक्षा होती. आरेचे जंगल कसे संरक्षित ठेवायचे आणि मुंबईला त्याचा कसा फायदा होणार यावर एक चर्चा नक्कीच करता येईल. त्यांनी सरकारी आयएएस अधिकाऱ्यांची समिती गठित केली आहे, त्यातून काय निष्पन्न होणार आहे, हे लवकरच समोर येईल, असे भाष्य वनशक्ती प्रकल्पाचे संचालक डी. स्टॅलिन यांनी केले.

Web Title: When will the Chief Minister and Environment Minister meet the environmentalists in the arena?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.