मुंबई : मुंबईला सर्वात जास्त सुरक्षित शहर मानले जाते. मात्र तरीही २०१९ साली आगीच्या घटनात एकूण ५ हजार २५४ दुर्घटनेत एकूण ३८ जणांचा मृत्यू झाला. त्यात २४ पुरुष आणि १४ महिलांचा समावेश आहे. २१६ जण जखमी झाले. त्यात १४२ पुरुष आणि ७४ महिलांचा समावेश आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना प्राप्त कागद पत्रामध्ये ही माहिती समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे आग शमविण्यासाठी आज तंत्रज्ञानाचा वापर केला जात असूनदेखील तब्बल २४ तासांहून अधिक काळ आग धुमसत असल्याने पुन्हा एकदा सुरक्षित मुंबईचा प्रश्न समोर आला आहे. या आगीच्या घटनेमुळे देखील पुन्हा एकदा मॉलमधील सुरक्षेसह अग्नी प्रतिबंधित उपाय योजना कितपत अद्ययावत आहेत? यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.
मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर या मॉलला भीषण आग लागली. मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील मोबाईल दुकानाला लागलेली आग संपूर्ण मॉलभर पसरली. आग विझवण्यासाठी दहा तासांपासून अधिक काळ अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. सिटी सेंटर मॉलमध्ये जवळपास २०० हून अधिक दुकाने आहेत. या सर्व दुकानांमध्ये मोबाईल ऑक्सेसरीजची दुकाने जास्त आहेत. त्यामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी आलेल्या दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. आता कोरोनामुळे मॉल हाऊस फुल नसल्याने सुदैवाने मनुष्य हानी झाली नाही. मात्र मॉल सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरक्षेची गरज आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, २००८ सालापासून २०१८ पर्यंत एकुण ५३ हजार ३३३ आगीच्या घटना घडल्या आहेत. यात ६६६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ४०४ पुरुष, २२३ महिला, ३४ मुले, ५ अधिका-यांचा समावेश आहे.