मुंबईतील ‘ये आग कब बुझेगी’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 12:49 AM2019-12-29T00:49:07+5:302019-12-29T00:49:30+5:30
गोदामे, दाटीवाटीने वसलेल्या वस्त्यांचा प्रश्न; अग्निसुरक्षेकडील दुर्लक्षांमुळे धोका वाढला
मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील खैरानी रोडवरील कारखान्यांना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला; आणि पुन्हा एकदा मुंबईच्या अग्निसुरक्षेचा, विशेषत: दाटीवाटीने वसलेल्या वस्त्यांसह गोदामांनी अग्निसुरक्षेकडे केलेल्या दुर्लक्षांचा मुद्दा ऐरणीवर आला. दुर्दैव म्हणजे मागील दहा वर्षांत मुंबईमध्ये ४८ हजार ४३४ आगी लागल्या असून, त्यामध्ये ६०० जण मृत्युमुखी पडले आहेत. अग्निसुरक्षेसाठी केवळ मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाचे प्रयत्न पुरेसे नसून, नागरिकांनीच याकामी पुढाकार घेत अग्निसुरक्षेचे नियम पाळत अग्निप्रतिबंधित उपाययोजना केल्या पाहिजेत, असे मत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी सातत्याने लागत असलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले आहे.
कुर्लातील लोकसंख्या आणि घनता क्षेत्रफळाचा विचार करता कुर्ल्यासारख्या दाटीवाटीच्या क्षेत्रात कमीत कमी जागेत अधिकाधिक लोक राहतात; असा मुंबई महापालिकेचा अहवाल म्हणतो. केवळ कुर्लाच नाही तर मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातील बहुतांश वस्त्या या दाटीवाटीने वसल्या आहेत. यात झोपड्या, चाळीसह इमारतींचा समावेश असलेल्या मोठ्या वसाहतींचाही समावेश आहे. माहुलसारख्या परिसरात प्रकल्पबाधितांसाठी बांधण्यात आलेल्या इमारती अत्यंत दाटीवाटीने उभ्या असून, येथे यापूर्वी लागलेल्या आगीचे माहुल येथील प्रकल्पबाधितांना चटके बसले.
पूर्व उपनगराचा विचार करता मुंबई ते ठाणे शहराला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या सुरुवातीपासून म्हणजे सायनपासून कमानी जंक्शनपर्यंत मोठ्या प्रमाणावर गोदामे आणि भंगारची दुकाने आहेत. या गोदामांमध्ये पुठ्ठ्यापासून कपड्यांच्या गारमेंटचा समावेश आहे. शिवाय भंगारच्या दुकानांलगत गॅरेजचा समावेश असून, येथे यापूर्वी मोठ्या प्रमाणावर आगी लागल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा परिसर वांद्रे-कुर्ला संकुलाला लागून असून, येथील वस्ती मोठी दाटीवाटीची आहे. हीच परिस्थिती धारावी येथील महाराष्ट्र नेचर पार्कलगतच्या वस्तीमध्ये असून, येथेही कारखान्यांसह गोदामांना लागून वस्ती आहे.
घाटकोपर पश्चिमेकडील असल्फा, कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार, साकीनाका, खैरानी रोड येथे मोठ्या प्रमाणावर छोटे छोटे गाळे, गारमेंट्स, कारखाने आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील दाटीवाटीच्या परिसरात एकावर एक अशी दुमजली घरे, कारखाने मोठ्या प्रमाणावर असून, येथील परिसर बहुतांशी चिंचोळा गल्ल्यांचा, चाळींचा, झोपड्यांचा आणि दाटीवाटीने वसलेल्या इमारतींचा आहे. यालाच लागून अंधेरी पूर्वेकडील दाटीवाटीच्या परिसराचा समावेश असून, येथील बहुतांशी वस्त्या डोंगरावर वसलेल्या आहेत; आणि याच परिसरात मोठ्या प्रमाणावर गोदामे आणि कारखाने आहेत.
पूर्व उपनगरातील मानखुर्द, चेंबूर आणि गोवंडी या परिसरात मोठ्या प्रमाणावर गल्लीबोळात व्यवसाय होत असून, कचरा वेचण्यासारखे उद्योग येथे मोठ्या प्रमाणावर केले जातात. लघुउद्योगांसह छोटेमोठे कारखाने येथील घराघरात असून, येथील डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीने येथील रहिवाशांचा, केवळ रहिवाशांचा नाही तर मुंबईकरांचाही श्वास गुदमरला आहे. मानखुर्द आणि गोवंडी परिसरात मोठ्या प्रमाणावर झोपड्या असून, यातील बहुतांशी झोपड्या या दुमजली आहेत. शिवाय येथील बहुतांश परिसरही चिंचोळा असून, येथेही यापूर्वी लागलेल्या आगीने मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे.
पश्चिम उपनगराचा विचार करता वांद्रे पूर्वेकडील गरीबनगरमध्ये यापूर्वी लागलेल्या आगीचा तर रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. येथेही मोठ्या प्रमाणावर गारमेंट असून, दाटीवाटीने वसलेल्या वस्त्यांमध्ये दुमजली घरांहून अधिक मजल्यांची घरे येथे उभी आहेत. कलिना, खार, मालाड, मालवणी येथील परिसरातही परिस्थिती काही वेगळी नाही. या सर्व ठिकाणचे परिसर हे दाटीवाटीचे असून, चिंचोळे असण्यासह जास्त लोकसंख्येच्या घनतेचे आहेत. मुळात अशा केवळ अशाच नाहीतर मनुष्य वस्ती आणि व्यावसायिक वस्ती; अशा प्रत्येक ठिकाणी अग्निसुरक्षेसह अग्निप्रतिबंधित नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आगीच्या घटना वाढत असून, या दुर्घटनांत नाहक बळी जात आहेत.
खैरानी रोडवरील परिसर अत्यंत दाटीवाटीचा असून, येथे गोदामांसह बरेच कारखाने आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विभाग असून, यापूर्वीही येथे तीन वेळा आगीच्या दुर्घटना घडल्या. त्यातील फरसाण दुकानाला लागलेल्या आगीत १२ कामगारांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता शुक्रवारी येथे लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास येथे आग लागली. ती विझविण्यासाठी घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे १६ फायर इंजीन, २ वॉटर टँकर, १० जम्बो वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. आग शुक्रवारी रात्री ११.१७ वाजताच्या सुमारास नियंत्रणात आली.
भारतीय धोके २०१६च्या सर्वेक्षणानुसार व्यवसायातील सातत्याला जो धोका दर्शवलेला आहे त्यामध्ये आगीपासून धोका हा तिसºया क्रमांकावर आहे, तसेच अपघात, मृत्यू व आत्महत्या २०१५च्या सर्वेक्षणानुसार २०१४ ते २०१५च्या कालावधीत १७,७०० जणांचा दिवसाला ४८च्या सरासरीने आगीच्या घटनांमुळे मृत्यू झाला आहे. या कालावधीमध्ये वाणिज्यिक इमारतीमधील आगीमध्ये ३०० पटीने वाढ झाली. सरकारी इमारतीमध्ये २१८च्या पटीने व राहत्या इमारतीमध्ये १०० पटीने आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ४२ टक्के लोकांचा मृत्यू रहिवाशी इमारतीत लागलेल्या आगीमुळे झाला आहे.
- सुभाष राणे, माजी अधिकारी, मुंबई अग्निशमन दल
जेथे आग लागण्याची शक्यता आहे. किंवा जेथे अग्निसुरक्षेचे नियम पाळले जात नाहीत, त्या परिसरांची अग्निशमन दलाने पाहणी करून कारवाई करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र कारवाई फिल्डवर कमी आणि आॅन पेपर जास्त होते. परिणामी आगीच्या घटना घडतात आणि नागरिकांचे बळी जातात.
- शकील अहमद, माहिती अधिकार कार्यकर्ते
दामूनगर असेल किंवा पश्चिम उपनगरातील कोणताही परिसर. अशा ठिकाणी सातत्याने आगी लागतात. मात्र आग लागू नये म्हणून महापालिका, अग्निशमन दल तत्पर राहत नाही. पश्चिम उपनगरात एकावर एक दुमजली, तीन मजली अशी बांधकामे उभी राहतात. अशा ठिकाणी सर्रास व्यवसाय केले जातात. येथे अग्निसुरक्षेचे नियम पाळणे अपेक्षित आहे.
- विनोद घोलप, अध्यक्ष, फाइट फॉर राइट फाऊंडेशन
कुर्ला, साकीनाका, खैरानी रोड, बैलबाजार, लाल बहादूर शास्त्री मार्गावरील छोट्यात छोट्या गोदामांनी, व्यावसायिकांनी, कारखानदारांनी अग्निसुरक्षेचे नियम पाळले पाहिजेत. अग्निप्रतिबंधित उपाययोजना केल्या पाहिजेत. असे केले नाही तर आगीच्या दुर्दैवी घटनांत बळी जातच राहतील.
- राकेश पाटील, रहिवासी, कुर्ला