अजित मांडके , ठाणे महापालिकेच्या २०१२ मध्ये लागलेल्या निवडणुकीच्या आधी सत्ताधाऱ्यांनी अपूर्ण असलेल्या कामांच्या शुभारंभाचा सपाटा लावला होता. त्यात वारकरी भवनाचाही समावेश होता. परंतु, आज तब्बल तीन वर्षे उलटूनही सत्ताधाऱ्यांना अथवा महापालिकेला या वारकरी भवनाचे द्वार वारकऱ्यांसाठी काही खुले करता आलेले नाही. पालिकेला अपेक्षिते भाडे मिळत नसल्याने ही वास्तू बंद आहे. वारकरी अथवा ज्येष्ठ नागरिक ते भरू शकत नसल्याने ही वास्तू धूळखात पडत असल्याचा कांगावा केला जात होता. परंतु, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही वास्तू कोणाला चालवायला द्यायची, यावरून राजकीय वाद सुरू असल्यानेच या भवनाचे द्वार उघडण्याच्या कामातील विघ्ने आणखी वाढली आहेत. महापालिकेने राममारुती रोड येथील गजानन महाराज चौक येथे भव्य तीन मजली वारकरी भवन उभारले आहे. या इमारतीचा लोकार्पण सोहळा २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी घाईत उरकला होता. याच इमारतीत ज्येष्ठ नागरिक भवनही आहे. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केला असता त्यांनी सांगितले, सध्या या वास्तूपोटी किती भाडे आकारावे, याबाबत एकमत होत नसल्यानेच ते खुले केलेले नाही.यासंदर्भात तत्कालीन महापौर अशोक वैती यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, निगा देखभालीच्या मुद्यावरून सध्या हे भवन खुले झालेले नाही. त्यासाठी एखाद्या संस्थेने पुढाकार घेतला तर ही वास्तू खुली होऊ शकेल. यासंदर्भात मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या अधिवेशनात कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुद्दा उपस्थित केला होता. तसेच डीपीडीसीच्या बैठकीतही त्यांनी पालकमंत्र्यांकडे विनंती केली होती. त्यानुसार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पालिकेला ही वास्तू खुली करण्याचे निर्देश दिले होते. आता पुन्हा अधिवेशनात या संदर्भातील मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती डावखरे यांनी लोकमतशी बोलतांना दिली. या संदर्भात पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
वारकरी भवनाचे हरी विठ्ठल होणार कधी?
By admin | Published: July 04, 2015 11:13 PM