बोगस पॅथॉलॉजीचा विळखा कधी सुटणार?
By Admin | Published: November 17, 2016 06:16 AM2016-11-17T06:16:55+5:302016-11-17T06:16:55+5:30
राज्यात गेल्या काही वर्षांत रोग निदानाचा काळा धंदा फोफावत आहे. वैद्यकीय शास्त्रशुद्ध पॅथॉलॉजीचे शिक्षण न घेतलेल्या व्यक्तीही पॅथॉलॉजी लॅब
मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांत रोग निदानाचा काळा धंदा फोफावत आहे. वैद्यकीय शास्त्रशुद्ध पॅथॉलॉजीचे शिक्षण न घेतलेल्या व्यक्तीही पॅथॉलॉजी लॅब उघडून निदान करून, रुग्णांची दिशाभूल करत आहेत. राज्यात ५ हजारांहून अधिक, तर मुंबईत दीड हजारच्या आसपास बोगस पॅथॉलॉजी लॅबचे जाळे पसरले आहे, पण यावर सरकार निष्क्रिय असल्याने, बोगस पॅथॉलॉजीचा विळखा कधी सुटणार, असा सवाल पॅथॉलॉजिस्टनी उपस्थित केला आहे.
डॉक्टर औषध देण्याआधी तपासण्या करून घ्यायला सांगतात, पण या तपासण्यांचा अहवाल देणारी व्यक्ती अशिक्षित असल्यास अहवाल चुकीचे येऊ शकतात. त्यावर विश्वास ठेऊन डॉक्टरांनी औषधोपचार केल्यास, रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट
अँड मायक्रोबायोलॉजिस्ट गेली कित्येक वर्षे प्रयत्नशील आहे.
थोड्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद सरकारकडून मिळाला आहे, पण अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे अजूनही बोगस पॅथॉलॉजीचा धंदा तेजीत सुरू असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप यांनी स्पष्ट केले. बोगस पॅथॉलॉजीला आळा घालण्यासाठी सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. शासनाने लॅबचे सर्वेक्षण केले पाहिजे. ज्या लॅबमध्ये अधिकृत पॅथॉलॉजिस्ट नाही, अशा लॅबवर कारवाई करावी. मुंबई, पुणे शहरातील अशा बोगस पॅथॉलॉजी लॅबवरही कारवाई व्हायला हवी. यासाठी शासन टाळाटाळ करत आहे. लोकांमध्येही जनजागृती होऊन त्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन डॉ. यादव यांनी केले आहे. (प्रतिनिधी)