अनेक ठिकाणी रांगा; काहींना लस न घेताच परतावे लागले माघारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशाबरोबरच राज्यात १६ जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. राज्याला मिळालेल्या एकेका लसीच्या डोसचे वितरण करण्यात आले. त्यामुळे राज्याच्या लस साठवणूक केंद्रात लसींचा खडखडाट झाल्याचे चित्र बुधवारी दिसले. परिणामी, मुंबईत अनेक लसीकरण केंद्रांवर लाभार्थ्यांना ताटकळत बसावे लागले, तर काहींना नोंदणी करूनही लस न घेताच परतीची वाट धरावी लागली.
मुंबईत दक्षिण मुंबई येथील माझगाव परिसरातील प्रिन्स अली खान रुग्णालयात सकाळी दोन तासांनंतरच लसीचे डोस संपल्याचे दिसून आले. त्यामुळे वाॅक इन लसीकरण किंवा नोंदणी करून तासंतास वाट पाहत असणाऱ्या लाभार्थ्यांना माघारी परतावे लागले. याविषयी, रुग्णालय प्रशासनास विचारणा केली असता, लसीच्या डोसविषयी पालिका प्रशासनाला पूर्वसूचना दिली होती, परंतु राज्यात डोसचा तुटवडा असल्याने नवीन साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पुढील सूचना येईपर्यंत लसीकरण बंद केल्याचे त्यांनी सांगितले.
* आज डाेस संपतील; जे. जे. रुग्णालयाला भीती
जे. जे. रुग्णालयात गुरुवारी लसीकरण प्रक्रिया सुरळीत पार पडली असली तरी शुक्रवारी लसीचे डोस संपतील, अशी भीती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी व्यक्त केली.
* ...अन् नायर रुग्णालयात वाढली गर्दी
नायर रुग्णालयात सकाळच्या सत्रातील लसीकरण सुरळीत पार पडले, मात्र अन्य खासगी रुग्णालयांतील केंद्रांवर लस नसल्याने अनेक लाभार्थ्यांनी नायरमध्ये गर्दी केली. यामुळे दिवसभर लस घेण्यासाठी येथे लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले, अशी माहिती नायर रुग्णालय प्रशासनाने दिली.
* सैफी रुग्णालयातील साठा संपला
चर्नी रोड येथील सैफी खासगी रुग्णालयात लस नसल्याने लाभार्थ्यांना परत जावे लागले. दुसरीकडे भायखळा पूर्व येथील मसिना रुग्णालयात लस घेण्यासाठी अनेक लाभार्थ्यांनी गर्दी केली, त्यात नोंदणी प्रक्रियेस काहीसा विलंब लागत असल्याने लाभार्थ्यांना वाट पाहत बसावे लागले. अखेरच्या सत्रात १० लाभार्थी येत नाहीत, तोपर्यंत नवीन लस उघडणार नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितल्याने प्रतीक्षेत असणऱ्या लाभार्थ्यांना फोनाफोनी करून आणखी लाभार्थ्यांची सोय करावी लागली. या सर्व प्रक्रियेला उशीर झाल्याने तीनच्या सुमारास गेलेल्या लाभार्थ्याला प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सहा वाजले.
* ...तर लसीकरणाचा वेग मंदावेल
राज्यात १२ जानेवारीपासून १ कोटी ६ लाख २३ हजार ५०० कोरोना प्रतिबंधक लसींच्या डोसचा पुरवठा केंद्राने केला. पुण्यातून राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तेथून लसीकरण केंद्रांना ही लस वितरित केली. आता राज्यात लसीचा साठा नाही. नव्याने लसींचा पुरवठा कधी होणार, याची निश्चित माहितीही नाही. राज्यात लसीकरणाचा वेग वाढविला आहे, नागरिकही लसीकरणाला प्रतिसाद देत आहेत. केंद्रांची संख्याही वाढविली आहे. त्या प्रमाणात लसींचा पुरवठा झाला पाहिजे. काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस पुरेल इतक्याच लसींचा साठा आहे. त्यामुळे पुढील ७२ तासांनंतर राज्यात लसीकरणाचा वेग मंदावेल.
- डॉ. दिलीप पाटील, राज्य लसीकरण अधिकारी
* साठा शिल्लक नाही; आरोग्य विभागाची माहिती
राज्याला पहिल्या टप्प्यात ९ लाख ९३ हजार डोसचा पुरवठा झाला होता. तेव्हापासून सढळ हाताने लसीकरण करण्यात आल्याचे सार्वजनिक आरोग्य क्षेत्राने दिलेल्या लसीच्या आकडेवारीवरून दिसून येते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक कोरोनाबाधितांचा आकडा राज्यात होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे सर्वाधिक कोरोना प्रतिबंधक लसीच्या वितरणात महाराष्ट्राला प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र राज्याला आतापर्यंत एक कोटी सहा लाख लसींचे डोस मिळाले आहेत. हे सर्व डोस राज्यातील प्रत्येक लसीकरण केंद्रापर्यंत वितरित केले आहेत. त्यामुळे आता राज्याकडे लसींचा साठा शिल्लक नसल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली.
* वाट पाहुनी जीव थकला
लस घेण्यासाठी प्रिन्स अली खान रुग्णालयात गेले हाेते. तिथे लस उपलब्ध नव्हती. त्यानंतर मसिना रुग्णालयात दुपारी तीनपासून सहा वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागले. त्यात अधिकच्या लाभार्थ्यांची सोयही आम्हालाच करावी लागली. लसीकरण सुरू झाल्यापासून आता कुठे नागरिक प्रतिसाद देऊ लागले आहेत, त्यात ही परिस्थिती उद्भवली तर नागरिक पाठ फिरवतील. दिवसभर वाट पाहण्यात जीव थकला.
- उज्ज्वला सरेकर, माझगाव
* म्हणून नायर रुग्णालयात गेलो
नोंदणी केल्याप्रमाणे दुपारच्या सत्रात सैफी रुग्णालयात लसीचा डोस मिळणे अपेक्षित होते. मात्र वेळेच्या आधी उपस्थित राहूनही लस नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर लस घेण्यासाठी चर्नी रोडवरून भर उन्हात मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात जावे लागले. या ठिकाणी दीर्घ काळ रांग लावल्यानंतर साडेतीन तासांनी लस मिळाली.
- रुपेश कदम, चर्नी रोड
* लसीकरणात राजकारण नको
कोरोना षडयंत्र आहे, काही खरे नाही, इथवरचे राजकारण पुरेसे होते. मात्र आता लसीकरण प्रक्रियेला वेग येत असताना संसर्गाला रोखण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून लस वितरणात दुजाभाव करणे हे केंद्र सरकारकडून अपेक्षित नाही. निदान यात तरी राजकारण नको.
- सोनाली कटारिया, घोडपदेव
* आमचा जीव जातोय
केंद्र आणि राज्य शासनात लसीकरणावरून वाद होत आहेत. या वादात सामान्यांचा जीव जातोय. मात्र राजकारण्यांचे याकडे पूर्ण दुर्लक्ष हाेत आहे. हे अत्यंत लज्जास्पद आहे.
- शर्मिला शाह, काळाचौकी
........................