लोकल ट्रॅकवर येणार तरी कधी...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2024 10:07 AM2024-05-13T10:07:21+5:302024-05-13T10:08:58+5:30

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर गेल्या कित्येक वर्षांपासून लोकल रुळांवरून घसरण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.

when will it come on local track | लोकल ट्रॅकवर येणार तरी कधी...?

लोकल ट्रॅकवर येणार तरी कधी...?

सिद्धेश देसाई, सरचिटणीस, मुंबई रेल प्रवासी संघ

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर गेल्या कित्येक वर्षांपासून लोकल रुळांवरून घसरण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. मुळातच देखभाल, दुरुस्तीमध्ये रेल्वे प्रशासन कमी पडत आहे. त्याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसत असून, लोकल रुळावर येण्यास एकपेक्षा जास्त दिवसांचा कालावधी लागत आहे. यामुळे मुंबईकरांचा वेळ वाया जात आहेच. शिवाय त्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे. यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने अशा घटनांचा मागोवा घेऊन ठोस उपाययोजना करण्यावर भर दिला पाहिजे. अन्यथा अशा घटनांमुळे लोकलला विलंब होण्यासह गर्दीमुळे प्रवाशांचे नाहक बळी जाण्याच्या घटनांत वाढ होण्याची भीती आहे.

मुंबई ही महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारताची आर्थिक राजधानी आहे. लोकल सेवा मुंबईची जीवनवाहिनी आहे. परंतु, गेले काही दिवस अनेकदा लोकल ट्रेन रुळावरून घसरल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली. रेल्वे रुळावरून घसरल्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये मुख्यत: रेल्वे रुळ आणि लोकलची खराब स्थिती, वळणावर वेगाने ट्रेन चालवणे ही कारणे आहेत. लोकल चालवताना मोटरमनची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यांच्या छोट्या चुकीमुळेसुद्धा मोठा अपघात होऊ शकतो. वरवर पाहता ही कारणे जरी तर्कसंगत असली, तरी अपघातांचा खोलवर अभ्यास करून मूळ कारणे शोधल्यास असे लक्षात येते की, हार्बर मार्गावर सध्या धावणाऱ्या लोकल खूप जुन्या आहेत. या लोकलची देखभाल करणेसुद्धा खूप जोखमीचे आहे.

साधारणत: एका लोकलची (जुन्या) ३ हजार ५०० प्रवाशांची क्षमता असते. परंतु, प्रत्यक्षात ५ ते ६ हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे अतिरिक्त वजनामुळे सुद्धा अपघात होतात. सध्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. अति तापमानामुळे रुळ प्रसरण पावतात. त्यामुळे रुळामध्ये तात्पुरता बदल घडतो. 

रुळांचे नियोजन करताना या गोष्टींचा विचार केलेला असतो; तरीही अतिरिक्त तापमानामुळे असे अपघात होऊ शकतात. मोटरमनने वेगाने ट्रेन चालवली किंवा जोरात ब्रेक मारल्याने सुद्धा रेल्वे रुळावरून घसरते. मोटरमनला दोष देताना, त्यांच्यावर असलेला कामाचा ताण, लोकल बाजूला थांबवून मेल - एक्स्प्रेसला दिलेली मोकळीक आणि अनेक विचित्र अपघात बघून सुद्धा शांततेने आपले काम करण्याची कसरत ते करत असतात, हे देखील लक्षात घेतले पाहिजे.

प्रशासनाने लवकरच नवीन लोकल घ्यायची प्रक्रिया सुरू करावी. प्रत्येक लोकलची ४ हजारांपर्यंत प्रवासी संख्या आणण्याचे एमयूटीपीचे लक्ष्य गाठण्यासाठी मेल एक्स्प्रेसप्रमाणेच लोकलकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. थोडक्यात मेल/एक्स्प्रेसला महत्त्व देताना लोकल सेवेलाही तेवढेच महत्त्व दिले पाहिजे. लोकलची देखभाल करतानाच रेल्वे रुळांची देखभाल करणेही गरजेचे आहे. अन्यथा लोकल अपघातांचे सत्र सुरूच राहील आणि रेल्वे प्रवाशांचे नाहक जीव जातील.

 

Web Title: when will it come on local track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.