मुंबई - कोकण रेल्वेचे खासगीकरण न करता भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून दुहेरीकरण करावे किंवा स्वतंत्र झोन बनवावेत अशा आशयाचे निवेदन कोकण रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने देण्यात आल्याची माहिती समितीचे सेक्रेटरी यशवंत जडयार यांनी दिली.
रेल्वेत नोकरीसह अन्य बाबतीतही भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे, स्टेशनवरील सर्व स्टॉल्स आणि केटरिंगची कंत्राटेही स्थानिकांना द्यावीत, कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर पूर्ण उंचीचा फलाट बांधून संपूर्ण शेड, लाइट, रेल्वे ब्रीज, स्पीकर, पिण्याचे पाणी आणि प्रसाधनगृहांची व्यवस्था करावी, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सर्व सवलती, सेवासुविधा पूर्ववत कराव्यात, कोकण रेल्वेची सांकेतिक भाषा मराठी करावी, मध्य रेल्वेवरून कोकण रेल्वेमार्गावर जाणाऱ्या सर्व मेल एक्स्प्रेस गाड्यांना दिवा जंक्शन येथे थांबा द्यावा आणि दिव्यात कोकणातील चाकरमान्यांची वस्ती मोठ्या प्रमाणावर असल्याने तेथे कोकणरेल्वेला थांबा द्यावा, अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.
अन्य मागण्या कोणत्या?- सावंतवाडी स्टेशनचा विकास टर्मिनस म्हणून करण्यात यावा. पश्चिम रेल्वेवरून कोकण रेल्वे मार्गावर दररोज वसई-सावंतवाडी पॅसेंजर किंवा मधू दंडवते एक्स्प्रेस आणि मध्य रेल्वेवरून कल्याण-सावंतवाडी पॅसेंजर, तसेच दादर-चिपळूण मेमू आणि मुंबई-रत्नागिरी इंटरसिटी एक्स्प्रेस, त्याचबरोबर रत्नागिरी-मडगावदरम्यान मेमू सेवा सुरू करावी.- सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस आणि रत्नागिरी-दिवा फास्ट पॅसेंजर दादर किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून सोडावी, तसेच पूर्वी सकाळी ६:३० ते ७ च्या दरम्यान सुटणारी रत्नागिरी-मडगाव एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी.- दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसला पेण, नागोठणे आणि रोहा ते रत्नागिरीदरम्यान सर्व ठिकाणी थांबे पूर्ववत करावेत. अंजनी रेल्वे स्टेशन येथे ओव्हर ब्रीज, भुयारी मार्ग बनवावा. रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे शेती असल्याने येथे ब्रीज आवश्यक आहे.- रत्नागिरी येथील जुन्या पिट लाइनच्या जागी नवी बांधण्यासाठी ती तात्पुरती बंद करण्यात आली होती. ती पुन्हा सुरू करावी आणि रत्नागिरी येथून मुंबई, सावंतवाडी, मडगाव, कारवारकडे जाणाऱ्या अतिरिक्त गाड्या सुरू कराव्यात.