हाताने मैला साफ करणे केव्हा थांबेल?; उच्च न्यायालयाने केली राज्य सरकारकडे विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 09:09 AM2022-02-04T09:09:58+5:302022-02-04T09:10:17+5:30

राज्यातील सर्व महापालिका हाताने मैल साफ करण्याची पद्धत केव्हा थांबवणार? अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली.

When will manual scavenging end in state mumbai high court asks govt | हाताने मैला साफ करणे केव्हा थांबेल?; उच्च न्यायालयाने केली राज्य सरकारकडे विचारणा

हाताने मैला साफ करणे केव्हा थांबेल?; उच्च न्यायालयाने केली राज्य सरकारकडे विचारणा

Next

मुंबई : राज्यातील सर्व महापालिका हाताने मैल साफ करण्याची पद्धत केव्हा थांबवणार? अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली. तर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मागण्यासंदर्भात करण्यात आलेल्या एका याचिकेवर माळशिरस नगर परिषदेला उत्तर देण्याचे निर्देश दिले.

नीता वाघमारे यांनी सासऱ्यांच्या जागी आपल्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचे निर्देश माळशिरस नगर पंचायतीला द्यावे, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. वीरेंद्रसिंह बिष्ट यांच्या खंडपीठापुढे होती. 

नीता यांचे सासरे स्वच्छता कर्मचारी होते. मैला साफ करत असताना २०१३ मध्ये त्यांचा मृत्यू झाल्याने नीताने त्यांच्या जागी आपल्याला नोकरी देण्यात यावी, अशी विनंती याचिकेद्वारे केली आहे. तर सफाई कर्मचाऱ्यांसाठी अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, यासाठी नगर परिषदेने नगर विकास विभागाला पत्र लिहिले आहे, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली.

अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना सफाई कामगार किंवा सफाई कर्मचाऱ्यांच्या पदांवर नोकऱ्या देण्याचे सरकारी धोरण असल्याची माहिती पनवेल महापालिकेने माहितीच्या अधिकाराखाली दिल्याचे नीता यांनी न्यायालयाला दिली. 

चार आठवड्यांनी सुनावणी
ही पद्धत महापालिका केव्हा थांबवणार आहेत, हे आम्हाला पुढच्या सुनावणीत सांगा, असे निर्देश उच्च न्यायालयाने सरकारला दिले. त्याचबरोबर न्यायालयाने माळशिरस नगर परिषदेला तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश देत याचिकेवरील सुनावणी चार आठवड्यांनी ठेवली.

अद्यापही हाताने मैला साफ करण्याची पद्धत सुरू असल्याची माहिती यावेळी उच्च न्यायालयाला देण्यात आली. ‘‘हाताने मैला साफ करण्याची पद्धत केव्हा थांबले? हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. राज्यभरातील सर्व महापालिका हे का थांबवत नाहीत?’’ अशी विचारणा न्यायालयाने सरकारकडे केली.

Web Title: When will manual scavenging end in state mumbai high court asks govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.