मुंबई : शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज स्मृतिदिन आहे. याच पार्श्वभूमीवर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारो शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल होत आहेत. तसेच, अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळासाहेबांना अभिवाद केले आहे.
भाजप आमदार राम कदम यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदनी एक्सवर एक पोस्ट करत मातोश्री बंगला जनतेसाठी खुला करण्याची मागणी केली आहे. बाळासाहेब ज्या मातोश्री बंगल्यामध्ये अनेक वर्ष राहिले, तो बंगला जिवंत स्मारक म्हणून जनतेसाठी खुला करावा, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे ज्या मातोश्री बंगल्यात राहिले. तेच खरे बाळासाहेबांचे खरे जिवंत स्मारक आहे. ते जनतेसाठी कधी खुले करणार? असा सवाल राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.
तसेच, उद्धव ठाकरे सध्या मातोश्री 2 वर राहायला गेले आहेत. याशिवाय, जुन्या मातोश्री बंगल्यात बाळासाहेब अनेक वर्ष राहिले. अनेक धाडसी निर्णय बाळासाहेबांनी ज्या बंगल्यात घेतले. दिवस रात्र त्यांचा ज्या स्थळी वावर होता. तेच खरे जिवंत स्मारक जनतेसाठी का खुले नाही? असा सवाल करत ही भावना प्रत्येक बाळासाहेबांना मानणाऱ्याची आहे, असे राम कदम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ११ वा स्मृतिदिन आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारो शिवसैनिक शिवाजी पार्कवर येत आहेत. यासाठी शिवाजी पार्कवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला फुलांची आकर्ष सजावट करण्यात आली आहे. शिंदे गट, भाजप तसेच महाविकास आघाडीचे नेतेही बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिवादनासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.