मुंबईची मेट्रो कधी धावणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:05 AM2021-09-13T04:05:01+5:302021-09-13T04:05:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मुंबईच्या उपनगरात मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ अशा दोन मेट्रो ...

When will the Mumbai Metro run? | मुंबईची मेट्रो कधी धावणार?

मुंबईची मेट्रो कधी धावणार?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मुंबईच्या उपनगरात मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ अशा दोन मेट्रो मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले. मात्र, या मेट्रो पुर्णत्वास जाण्यास पुढील वर्ष उजाडणार आहे. प्राधिकरणाच्या दाव्यानुसार, २०२१ मध्ये मेट्रो मार्गी लागणार होती. मात्र, कोरोना आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे मेट्रो रूळावर येण्यास पुढील वर्षाची वाट बघावी लागणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रो प्रकल्पांचे काम ८० टक्के पुर्ण झाले आहे. आजघडीला मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रो मार्गिकांवर दहिसर-चारकोप आणि दहिसर पूर्व-आरे स्थानकादरम्यान मेट्रोच्या चाचण्या सुरू आहेत. रेल्वे सुरक्षा आयुक्तांची तपासणी आणि इतर औपचारिकता मार्गी लागल्यानंतर पुढील प्रक्रिया होतील. पुढील वर्षी मेट्रो मार्गी लागल्यानंतर पश्चिम उपनगरांतील रस्ते वाहतुकीसह लोकल वाहतुकीवर ताण कमी होईल शिवाय प्रवाशांना दिलासा मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

लेट मार्क

- मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ दोन टप्प्यांत कार्यान्वित होणार होती.

- डहाणूकर वाडी ते आरे हा २० किलोमीटरचा पहिला टप्पा सप्टेंबर २०११ मध्ये कार्यान्वित होणार होता. मात्र, तो झाला नाही.

- संपूर्ण मार्ग जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. मात्र, त्यास आणखी विलंब होण्याची शक्यता आहे.

- मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ हे दोन्ही प्रकल्प मार्च २०२० पर्यंत मार्गी लागणार होते. मात्र, कोरोनामुळे लेट मार्क लागला.

----------------

पहिल्या टप्प्यात जुलै महिन्यांत मेट्रो ७ ची चाचणी सुरू करण्यात आली. मेट्रो-२ च्या पहिल्या टप्प्यात मॉक ड्रील सुरु आहे.

दोन्ही मेट्रो ऑक्टोबर २०२१ मध्ये रूळावर येणार होत्या. मात्र, आता त्या जानेवारी २०२२ मध्ये रुळावर येणार आहेत.

----------------

चाचणी

- उपप्रणाली, उपकरणांची डायनॅमिक परिस्थितीत चाचणी

- सिग्नलिंग, टेलिकॉम आणि प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअरसह एकत्रिकरणाची चाचणी

----------------

- जपानच्या तांत्रिक सहकार्याने प्रथमच मेट्रो ट्रेनचे सेट तयार होत आहेत.

- प्रोपल्शन सिस्टम, एअर सस्पेंशन, केबल्स, ट्रॅक्शन कंट्रोल ॲन्ड मॅनेजमेंट सिस्टीम आणि ब्रेक सिस्टीम घटक यासारखे अनेक निर्णायक प्रणाल्या आणि घटक जपान, इटली, दक्षिण कोरिया आणि जर्मनीमधील आहेत.

- सिग्नलिंग आणि टेलिकॉमच्या बाबतीत हे घटक फ्रान्स, डेन्मार्क, दक्षिण कोरिया, फिनलँड आणि स्पेनमधील आहेत.

- प्रोपल्शन आणि ब्रेक सिस्टीमचे सिंक्रोनाइझेशन भारत, युरोप आणि जपान या तीन टाईम झोनमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले जात आहे.

----------------

- मुंबईच्या पश्चिम उपनगरात मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गांवर धावणाऱ्या मेट्रोचे डबे बंगळुरु येथील बीईएमएलच्या कारखान्यात तयार होत आहेत.

- डब्यांच्या अंतर्गत सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रवाशांवर लक्ष ठेवले जाईल.

- प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे बसविण्यात येत आहेत.

- कोणीही प्रवासी अथवा वस्तू रुळांवर पडणार नाही.

----------------

- मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मुळे दरवर्षी २ लाख ५० हजार टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात घट होईल.

- मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ सुरु झाल्यानंतर अंधेरी ते दहिसर पट्टयातील १३ लाख प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे.

- चालकविरहीत ट्रेनशी अनुकूलता, ऊर्जा वाचविणारी पुनरुत्पादक ब्रेक सिस्टीम, प्रत्येक बाजूला चार दरवाजांची स्टेनलेस स्टील बॉडी आणि प्रवाशांना सायकलसह प्रवास करता येऊ शकेल.

Web Title: When will the Mumbai Metro run?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.