Join us

नवी इमारत कधी उभी राहणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बीडीडी चाळीचा पुनर्विकास प्रकल्प अनेक वर्षे रखडला होता. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा नारळ फुटला आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बीडीडी चाळीचा पुनर्विकास प्रकल्प अनेक वर्षे रखडला होता. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा नारळ फुटला आणि हा प्रकल्प कार्यान्वित झाला. हा प्रकल्प सुरू व्हावा म्हणून ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळ समितीने खूप प्रयत्न केले. आता कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. रहिवाशांनी सरकारचे आभार मानले आहेत. आता बीडीडी चाळीचा पुनर्विकास लवकर व्हावा आणि नव्या घरात राहायला जाण्याचे आमचे स्वप्न लवकर पूर्ण व्हावे, असा आशावाद कमलाकर नडगावकर यांनी व्यक्त केला.

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळ क्रमांक सहामधील खोली क्रमांक पाचमध्ये राहत होतो. सध्या माझी तिसरी पिढी येथे राहत होती. अतिशय जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये सर्व कुटुंब गुण्यागोंविदाने राहत होते. बीडीडी चाळीमध्ये गळतीचे प्रमाण, सिलिंगचे तुकडे खाली पडण्याचे प्रमाण वाढायला लागले. आणि अशा वेळी पुनर्विकासाची बातमी आम्हाला सरकारकडून मिळाली. आम्हाला आनंद झाला.

सर्व रहिवाशांनी ठरविले पुनर्विकासाच्या या कामाला आपण सकारात्मक प्रतिसाद द्यायचा. सर्व प्रकाराच्या तपासण्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून आम्ही रहिवाशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. २०१९च्या जून महिन्यात आम्ही संक्रमण शिबिरात स्थलांतरित झालो. म्हाडाने आम्हाला उत्तम संक्रमण शिबिरे राहण्यासाठी दिली आहेत. ज्यामध्ये कोणत्याही प्रकाराची गैरसोय नाही.

आता आम्ही सर्व जण आमची जुनी इमारत कधी खाली होणार आहे आणि नवीन इमारत कधी उभी राहील. आम्ही कधी पाचशे चौरस फुटांच्या घरात जाणार? याची वाट पाहत आहोत. भविष्यात नवीन इमारतीतदेखील आम्ही सर्व जण गुण्यागोंविदाने व आनंदाने राहू, अशी आशा असल्याचे कमलाकर नडगावकर यांनी सांगितले.