कामाच्या वेळेपेक्षा गुणवत्तेचं मोजमाप कधी होणार?; भाजपा आमदार नितेश राणेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 02:27 PM2020-02-13T14:27:18+5:302020-02-13T14:29:56+5:30
तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारनं ५ दिवसांचा आठवडा गिफ्ट दिला असला तरी यावरुन विरोधकांनी टीकास्त्र सोडलं आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी यावरुन कर्मचाऱ्यांच्या कामाची गुणवत्ता याचं मोजमाप कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
याबाबत नितेश राणेंनी ट्विट करुन म्हटलंय की, मंत्रालयाच्या कामकाजात कामाची वेळ नव्हे तर गुणवत्ता पाहिजे. मग आठवडा ५ दिवसांचा असो किंवा ७ दिवसांचा, याचं मोजमाप कधी होणार? असं त्यांनी विचारलं आहे.
गेल्या अनेक वर्षापासून राज्य शासकीय कर्मचारी संघटनेकडून ५ दिवसांचा आठवडा करावा ही मागणी लावून धरली होती. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा करावा असं कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने बुधवारच्या बैठकीत कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करुन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.
Quantity नाही quality पाहिली पाहिजे मंत्रालय कामकाजात, मग आठवडा 5 दिवसांचा असो, किंवा 7 दिवसांचा !!
— nitesh rane (@NiteshNRane) February 13, 2020
याच मोजमाप कधी होणार ?
ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयावर राज्यातील मंत्रिमंडळातील सदस्य बच्चू कडू यांनी जाहीर विरोध केला. सरकारी कामासाठी लोकांना वारंवार अधिकाऱ्यांकडे फेरे मारावे लागतात. काही कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात. पण काहीजण सरकारी वेळेतही काम करत नाही. मग अशा कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा कशासाठी? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच सरकारला जर ५ दिवसांचा आठवडा करायचा असेल तर कर्मचाऱ्यांना ७ दिवसांचा पगार का दिला जातो? असंही त्यांनी म्हटलं आहे.
तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे पगारवाढ अन् दुसरीकडे सुट्ट्यांमध्ये वाढ, सरकारच्या मनात नेमकं चाललंय काय? असा सवाल त्यांनी केला आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचाच आठवडा आहे. तर, देशातील 7 राज्यांमधील कर्मचाऱ्यांनाही 5 दिवसांचा आठवडा असून 2 दिवस सुट्टीचा लाभ मिळत आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही हा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा विकेंड कुटुंबासमवेत आनंदी जाणार आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
'लंचटाईममध्ये 2-2 तास पाय मोकळे करायला जातात, तेच हे कर्मचारी'
'मेगाभरती' करणाऱ्या भाजपाला गळती; नगरसेवक घेताहेत अजितदादांच्या भेटीगाठी
भाजप नेत्यांच्या निषेध मोर्च्यातील हसऱ्या मुद्रेवरून राष्ट्रवादीचा हल्लाबोल
सरकारला अडचणीत आणणारी वादग्रस्त वक्तव्ये टाळा; उद्धव ठाकरेंच्या सूचना
भाजपा प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटलांची नियुक्ती, मुंबईचे अध्यक्षही ठरले!