Join us

मुंबईतील शाळांची घंटा वाजणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयासाठी सोमवारी शिक्षण विभागाकडून आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना प्रस्ताव सादर ...

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयासाठी सोमवारी शिक्षण विभागाकडून आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली. मुंबईतील शाळा सुरू करण्याआधी महापालिका शिक्षण विभागाकडून आवश्यक एसओपी तयार करण्यात आल्या आहेत. २४ वॉर्डातील शाळांचे विभागीय सहायक आयुक्तांच्या मदतीने निर्जंतुकीकरण, मुलांना देण्यात येणाऱ्या मास्कची खरेदी, शाळा सुरू करताना पालकांकडून घेण्यात येणारी संमती, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण या सगळ्यांची पूर्वतयारी झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. शाळा सुरू करण्याचा निर्णय मुंबईतील सर्व व्यवस्थापन, माध्यम आणि मंडळाच्या शाळांना लागू असल्याने आता सोमवारी आयुक्त शाळा सुरू करण्याबाबत काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिका शाळांतील जवळपास ७३ टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यातही शाळा सुरू करण्यास परवानगी मिळालीच तर तोपर्यंत प्रामुख्याने ८ वी ते १० वी म्हणजेच माध्यमिकच्या शिक्षकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल अशी माहिती तडवी यांनी दिली. शाळांच्या निर्जंतुकीकरणाचे कामही लगेच होईल अशी तयारी त्यांनी दर्शविली आहे. शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थीसंख्या पाहून वर्ग एकदिवसाआड भरवायचे की कसे याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, राज्य सरकारच्या एका बाकावर एक विद्यार्थी, प्रवेशव्दारावर स्क्रिनिंग, हात धुण्यासाठी मुबलक पाणी अशा सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. प्रत्येक विद्यार्थी शाळॆत जसजसा उपस्थित होईल तसे त्याला त्यांच्या वर्गशिक्षक, शाळा प्रशासनाकडून मास्क वाटपाची सोयही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पालकांचे संमतीपत्र बंधनकारक

महानगरपालिका शिक्षण विभागाकडून पालकांच्या संमतीपत्राचा नमुना बनवून घेण्यात आला असून पालकांनी हे संमतीपत्र दिले तरच विद्यार्थी शाळांमध्ये उपस्थित राहू शकणार आहेत. शिक्षण विभागाच्या नियमाप्रमाणे पालक अजूनही धास्तावलेले असल्याने उपस्थितीची जबरदस्ती मुलांवर करता येणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना यापुढेही काही दिवस आपले ऑनलाइन शिक्षणच सुरू ठेवायचे आहे, त्यांना त्याप्रमाणे महानगरपालिका शिक्षण विभागाने सुरू केलेल्या ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा वापर करता येणार असल्याचे तडवी यांनी सांगितले.