विद्यापीठाच्या दुसऱ्या पेट परीक्षेला मुहूर्त कधी मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:09 AM2021-08-26T04:09:13+5:302021-08-26T04:09:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विद्यापीठामध्ये संशोधनाला चालना मिळावी यासाठी मार्च २०२१ मध्ये झालेल्या अधिसभा बैठकीमध्ये पीएच.डी. प्रवेश परीक्षा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विद्यापीठामध्ये संशोधनाला चालना मिळावी यासाठी मार्च २०२१ मध्ये झालेल्या अधिसभा बैठकीमध्ये पीएच.डी. प्रवेश परीक्षा (पेट) वर्षातून दोन वेळा घेण्याचे प्र-कुलगुरु रवींद्र कुलकर्णी यांनी जाहीर केले होते. मार्चमध्ये पहिली पेट परीक्षा झाली. दुसऱ्या पेट परीक्षेबाबत विद्यापीठाकडून अद्याप कोणतीही सूचना जारी करण्यात आली नाही. वर्षातील दुसरी पेट परीक्षा कधी घेण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
विद्यापीठात झालेल्या पहिल्या पेटला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतरही विद्यापीठाकडून या वर्षातील दुसरी पेट परीक्षा घेण्यासंदर्भात तारीख जाहीर करण्यात होत असलेल्या विलंबाचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसऱ्या पेट परीक्षेची तारीख जाहीर केल्यास मार्चमधील पेट परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले तसेच नवीन विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तयारीमध्ये सातत्य ठेवता येणार आहे, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून उमटत आहेत.
मुंबई विद्यापीठामध्ये संशोधनावर कमी भर दिला जातो. त्यातही ज्या विद्यार्थ्यांना संशोधन करून पीएच.डी. करायची असते, अशा विद्यार्थ्यांसाठी वर्षातून एकदाच पेट परीक्षा घेण्यात येत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य ॲड. वैभव थोरात यांनी मार्चमध्ये ऑनलाइन झालेल्या अधिसभेमध्ये पेट परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याची मागणी केली. यावर अधिसभा अध्यक्ष प्र-कुलगुरु रवींद्र कुलकर्णी यांनी पेट परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचे मान्य केले. मार्च २०२१ मध्ये झालेली पेट परीक्षा ही तीन वर्षाने झाल्याने या परीक्षेला महाराष्ट्रातून तब्बल ६५१२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यामध्ये परराज्यातून ४६१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. २०२१ मधील पहिल्या पेट परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोट
पीएच.डी.साठी आवश्यक असलेल्या पेट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी ही परीक्षा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये घेण्यात यावी. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये परीक्षा झाल्यास संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असे विनंतीवजा पत्र विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांना लिहिले असून, त्याच्याकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे.
वैभव थोरात, सिनेट सदस्य , मुंबई विद्यापीठ