एसपी कम्पाउंडचा तिढा कधी सुटणार?
By admin | Published: February 14, 2017 04:42 AM2017-02-14T04:42:55+5:302017-02-14T04:42:55+5:30
परळ गावातील २०४ प्रभागातील शापूरजी पालनजी कम्पाउंडचा (एसपी कम्पाउंड) पुनर्विकास आणि येथील रहिवाशांना सतावणारा
मुंबई : परळ गावातील २०४ प्रभागातील शापूरजी पालनजी कम्पाउंडचा (एसपी कम्पाउंड) पुनर्विकास आणि येथील रहिवाशांना सतावणारा पाणी व शौचालयाचा प्रश्न प्रचारादरम्यान अधिक चर्चेचा ठरत आहे. कम्पाउंडबाहेर मृत्यू पावलेल्या व्यक्तीला येथील अरुंद गल्ल्यांमुळे पुन्हा घरात नेणे शक्य होत नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तींच्या शवावरील अंत्यसंस्कारही कम्पाउंडबाहेरच करावे लागत असल्याचे स्थानिक मतदार संजय पतंगे यांनी सांगितले. त्यामुळे हा मुद्दा आगामी महापालिका निवडणुकीमध्ये कळीचा ठरणार आहे.
पतंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एस.पी. कम्पाउंडचा पुनर्विकास हा प्रचारातील भावनिक मुद्दा ठरू शकतो. येथील चिंचोळ्या गल्ल्यांमुळे कम्पाउंडबाहेर मृत पावलेल्या इसमाला पुन्हा घरात नेता येत नाही. त्यामुळे मयत इसमावरील अंत्यसंस्कारही गल्लीबाहेरच करावे लागतात. गेल्या अनेक वर्षांपासून येथील पुनर्विकास रखडला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठीच सेनेला महापालिका, विधानसभा व लोकसभेत येथून चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, स्थानिकांचा प्रश्न सोडवण्यात सेनेला यश
आले नाही.
सत्तेत असूनही विरोधकाची भूमिका घेतलेल्या पक्षांना स्थानिकांचे प्रश्न सुटणार नाही, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष सचिन देसाई यांनी लगावला आहे. देसाई म्हणाले की, ‘कम्पाउंडमधील रहिवाशांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे सातत्याने पालिका दरबारी प्रश्न मांडत आहे.
सत्तेत असलेल्या सेनेच्या नेत्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याची गरज होती. मात्र, पाण्याच्या प्रश्नासाठी हंडा
मोर्चा काढत, सेनेच्या नेत्यांनी स्वत:चेच हसू करून घेतले. जर सत्तेत असून प्रश्न सुटत नसतील, तर सेनेने या जागेवर लढताच कामा नये.
कारण हा त्यांचा नैतिक पराभव आहे,’ अशी टीकाही देसाई यांनी केली. (प्रतिनिधी)