Join us

विद्यार्थ्यांना टॅब मिळणार कधी..? पाच महिन्यांनंतरही प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 2:04 AM

शालेय पोषण आहार, शैक्षणिक साहित्याचे वाटप या योजनांप्रमाणे विद्यार्थ्यांना टॅब देण्याच्या पालिकेच्या योजनेचेही बारा वाजले आहेत.

मुंबई : शालेय पोषण आहार, शैक्षणिक साहित्याचे वाटप या योजनांप्रमाणे विद्यार्थ्यांना टॅब देण्याच्या पालिकेच्या योजनेचेही बारा वाजले आहेत. मुलांच्या पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने ही योजना तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. मात्र नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन पाच महिने उलटले तरी पालिका शाळेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना अद्याप टॅब मिळालेला नाही.पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येते. मात्र या वस्तू नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी मिळत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. या लेटमार्कमुळे या योजनेचा लाभ होण्याऐवजी विद्यार्थ्यांचे नुकसानच होत आहे. पालिकेचे शिक्षण हायटेक करण्यासाठी पालिकेने व्हर्चुअल क्लासरूम सुरू केले. तसेच आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला. टॅबवरून अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांची गोडी वाढेल व त्यांच्या पाठीवरील ओझेही कमी होईल असा यामागचा विचार होता.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ही संकल्पना होती. त्यानुसार पहिल्या वर्षी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांपासून टॅब देण्याची योजना सुरू करण्यात आली. मात्रवर्ष संपायला आले तरी प्रशासन निविदा प्रक्रियेत अडकले आहे.इयत्ता ९वीचा अभ्यासक्रम बदलल्याने या मुलांचे जुने टॅब आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे ९वीच्या विद्यार्थ्यांकरिता नवीन टॅब खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. डिसेंबर अखेरपर्यंत १३ हजार टॅब खरेदी करण्यात येणार आहेत.निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात-गेले पाच महिने इयत्ता नववीचे विद्यार्थी टॅबपासून वंचित राहिले आहेत. विद्यार्थ्यांना नवीन टॅब मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा आणि निविदा प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करा, असे आदेश शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.मात्र प्रशासनाची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने विद्यार्थ्यांना अजूनही टॅबची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी १३ हजार टॅब खरेदीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दोन दिवसांत टॅबचे दर ठरवण्याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. येत्या महिनाभरात विद्यार्थ्यांपर्यंत टॅब पोहोचतील, असे शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाशाळाविद्यार्थी