१०६० वाहनांचा शोध लागणार तरी कधी ? गेल्या वर्षभरात २,४४५ वाहने चोरांनी पळवली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 10:00 AM2024-01-22T10:00:03+5:302024-01-22T10:01:42+5:30
वर्षभरात २,४४५ वाहने चोरांनी पळवल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
मुंबई : गेल्या वर्षभरात दोन हजार ४४५ वाहने चोरीला गेली. या प्रकरणी मुंबई शहर व उपनगरांतील पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद करण्यात आले. मात्र, यापैकी केवळ १३८४ वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अद्यापही १०६१ वाहनांचा पोलिसांना शोध लावता आला नाही. अनेक दिवस झाले तरी वाहनांचा लावणार कधी? असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.
चोरी, घरफोड्या, दरोड्यांसह वाहन चोरीच्या घटनांमध्ये अनेक दिवसांपासून वाढत होत आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मोटारसायकल, कार, रिक्षांसह अन्य वाहने चोरली. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपींकडून वाहने जप्त करण्यात आली. गुन्ह्यांमध्ये चोरांनी वाहनांचे नंबरप्लेट बदलून इतरांना खोटे कागदपत्रे तयार करून विकल्याचे समोर आले आहे.
तपासासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग :
वाहन ट्रॅकिंग यंत्र हे एक उदयोन्मुख तंत्रज्ञान आहे, जे वैयक्तिक आणि सार्वजनिक वाहनांसाठी उपयुक्त ठरते. अनेक गुन्ह्यांच्या तपासादरम्यान जीपीएस यंत्रणेमुळे वाहनांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या यंत्रणेमुळे वाहन कोठेही असले तरी त्याचे लोकेशन पोलिसांना समजते.
बदलत्या काळानुसार पोलिस खातेही हायटेक झाले आहे.
पोलिसही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करतात.
गुन्हा घडल्यानंतर सोशल मीडियावरील ग्रुपमध्ये गुन्ह्यांची माहिती दिली जाते.
अनेक चोरीला गेलेल्या वाहनांचा फोटो, नंबरमुळे चोरांना पकडून वाहने जप्त करण्यात आली आहेत. १३८४ वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
वाहने चोरीमागची कारणे :
पोलिसांनी अटक केलेले अनेक आरोपी मुंबईच्या बाहेरून आल्याचे निष्पन्न झाले आहे. हे आरोपी वाहने चोरून नंबर बदलतात. स्वस्त दरात वाहने विकतात. मौजमजेसाठी, नशेची तलफ भागविण्यासाठी, दुचाकीसह अन्य वाहने चोरांनी पळवल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे.
मुंबईत राहूनच चोरांना वाहनांसह ताब्यात घेतले. वाहन कोठेही असले तरी त्याचे लोकेशन पोलिसांना समजते.