१५ जलद गाड्यांना सिंधुदुर्गात थांबा कधी? कोकण रेल्वे प्रवाशांचा सवाल
By सचिन लुंगसे | Published: May 15, 2024 07:33 PM2024-05-15T19:33:54+5:302024-05-15T19:34:29+5:30
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १५ सुपरफास्ट एक्सप्रेस रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेच थांबत नाहीत.
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १५ सुपरफास्ट एक्सप्रेस रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेच थांबत नाहीत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी दोन स्टेशनला या गाड्या थांबल्या तर प्रवाशांना याचा फायदा होईल, याकडे कोकण रेल्वे प्रवाशांनी लक्ष वेधले.
रत्नागिरी जिल्ह्यातील विलवडे, राजापूरनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीसह वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी याठिकाणी सुफरफास्ट रेल्वे गाड्या थांबल्या पाहिजेत. काही स्थानकावर दिवा-सावंतवाडी वगळता कोणतीच गाडी थांबत नाही. त्यामुळे १५ जलद गाड्या सिंधुदुर्गमध्ये थांबल्या पाहिजेत. रत्नागिरीतील दोन अधिक स्थानके त्यांनी घेतली पाहिजेत. शिवाय सावंतवाडी टर्मिनलचे काम पूर्ण केले पाहिजे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
दिवा-सावंतवाडी, दादर-रत्नागिरी आणि तुतारी केवळ याच गाड्या अधिक स्थानकांवर थांबतात. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता वसई सावंतवाडी, कल्याण-सावंतवाडी आणि पुणे-सावंतवाडी या तीन गाड्यांसह दादर-चिपळूण मेमू सोडणे गरजेचे आहे. दादरवरून सकाळी दहा वाजता चिपळूण-मेमू रोज सुटली पाहिजे. सायंकाळी नऊ वाजता चिपळूण-मेमू पुन्हा दादरला आली पाहिजे, या मागण्या कोकण रेल्वे प्रवासी संघटनांनी केल्या आहेत.