कबुतरांची त्रासदायक ‘फडफड’ कधी बंद होणार ? याआधी पालिकेनेही दिला होता इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 10:21 AM2024-01-08T10:21:56+5:302024-01-08T10:22:54+5:30
कबुतरखाने बंद करण्याचा इशारा पालिकेने अनेकदा दिला असला तरी कबुतरखाने काही बंद झालेले नाहीत.
मुंबई : कबुतरांना दाणे टाकू नका, त्यांना खाऊ घालणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला असला तरी कबुतर आणि कबुतरखान्यांची गुटर्गू काही थांबलेली नाही. कबुतरखाने बंद करण्याचा इशारा पालिकेने अनेकदा दिला असला तरी कबुतरखाने काही बंद झालेले नाहीत.
विशेष म्हणजे कबुतरखान्यांच्या उपद्रवाचा प्रश्न अगदी विधानसभेतही उपस्थित झाला होता. मुंबईत एकही कबुतरखाना वसवलेला नाही किंवा कोणत्याही कबुतरखान्याला हेरिटेज दर्जा नाही. पालिकेने कारवाईचा इशारा दिला असला तरी काही राजकीय पक्ष आणि काही समाजघटकांचा विरोध यामुळे नजीकच्या काळात तरी कबुतरखाने बंद होतील, की नाही याविषयी ठामपणे सांगता येत नाही.
दादर कबुतरखाना ही तर मुंबईची ओळख बनून गेली आहे. या ठिकाणी १९३३ साली पाण्याचे कारंजे बांधण्यात आले. यथावकाश तेथे कबुतरांनी घिरट्या घालायला सुरुवात केली. बघता बघता हे ठिकाण कबुतरांची ‘राजधानी’च होऊन गेले आहे. हा कबुतरखाना बंद व्हावा म्हणून पालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला; परंतु कबुतरखाना बंद करणे काही शक्य झाले नाही.
मुंबईत सुमारे नऊ ठिकाणी कबुतरखाने आहेत.
गेट वे ऑफ इंडिया, ऑगस्ट क्रांती मैदान, गिरगाव चौपाटी, नवजीवन सोसायटी, एम.एस.अली रोड जंक्शन व दादर या ठिकाणी कबुतरखाने आहेत.
विधानसभेतही ‘कबुतर’वर चर्चा :
कबुतरांच्या उपद्रवाचा प्रश्न एकदा विधानसभेतही उपस्थित झाला होता. त्यावेळी मुंबईतील कोणत्याही कबुतरखान्याला हेरिटेज दर्जा नाही आणि तो देताही येणार नाही, असे तत्कालीन मंत्री उदय सावंत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले होते.
कबुतरांमुळे होणारे आजार :
मध्यन्तरी के.ई एम रुग्णालयातील श्वसन विकार चिकित्सा व पर्यावरण प्रदूषण संस्थेने सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणामध्ये कबुतरांची विष्ठा व पंख यातून बाहेर पडणाऱ्या विशिष्ट घटकांमध्ये फंगल स्पोर्स आढळून आले होते. त्यामुळे माणसांना एक्स्टरेन्टिक ॲलर्जिक अल्व्होलिटिस हा आजार होऊ शकतो. या आजारात खोकला, दमा अशी लक्षणे दिसतात.