Join us

टॅक्सी चालकांच्या मनमानीला वेसण कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 12:09 PM

गाडीवर दिवा लावण्यासाठी हवी पुन्हा मुदतवाढ

नितीन जगताप 

मुंबई : घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईत रेल्वे स्थानकांपासून ते अगदी बस स्थानकांपर्यंत प्रत्येक जण सकाळपासून रात्रीपासून धावतच असतो. रात्रीही मुंबई झोपत नाही. रेल्वे स्थानकात उतरून इच्छित स्थळी जाण्यासाठी टॅक्सीला हात करावा तर टॅक्सीत आधीच प्रवासी बसलेला असतो किंवा टॅक्सीचालक अनेकदा भाडे नाकारताना दिसतात. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. कामावर रोजच लेटमार्कचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून टॅक्सीवर हिरवा, लाल, पांढरा असे तीन दिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, ही सुविधा मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरटीए अर्थात मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाला आणखी मुदतवाढ हवी असून, हा दिवा लागणार कधी, टॅक्सी चालकांच्या मनमानीपणाला वेसण लागणार कधी, असा सवाल मुंबईकर करताना दिसत आहेत. 

टॅक्सी चालक अनेकदा प्रवाशांसोबत मनमानी करतात. त्याला लगाम लावण्यासाठी टॅक्सीवर दिवा लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  राज्य शासनाने याबाबतचे मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाला  सर्व काळ्यापिवळ्या टॅक्सींना  दिवा लावणे अनिवार्य केले होते. यावर सातत्याने मुदतवाढ  देण्यात आली. ३० मार्च २०२३ पर्यंत मुदत संपल्यानंतर एमएमआरटीएने तयारी पूर्ण झाली नसल्याचे सांगत पुन्हा एकदा मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे.    टॅक्सी मिळवणे हे मुंबईकरांसाठी एक दिव्य पार करण्यासारखेच असते. या पार्श्वभूमीवर भाडे स्वीकारणारीच टॅक्सी थांबवणे मुंबईकरांना सोयीचे जावे यासाठी टॅक्सीवर टॅक्सी सेवेची सद्य:स्थिती दर्शविणारे दिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. टॅक्सीचालक आणि प्रवाशांसाठी दोघांसाठीही टॅक्सीवरचे दिवे सोयीचे ठरणार आहेत. 

रात्रीच्या वेळी अनेकदा टॅक्सी चालक जवळचे भाडे नाकारतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय  टॅक्सीवर दिवे लावल्यास टॅक्सी उपलब्ध आहे का, आधीच समजेल त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल. - सुयश काळे, प्रवासी 

असे काम करतील दिवे.टॅक्सीवर हिरवा, लाल आणि पांढरा असे तीन दिवे असतील. हिरवा दिवा सुरू असल्यास टॅक्सी भाडे घेण्यास उपलब्ध आहे, असे प्रवाशांनी समजावे. तर लाल दिवा असेल तर त्यात प्रवासी आहे, असे समजावे. त्याच वेळी पांढरा दिवा पेटता असेल तर टॅक्सी सध्या भाडे स्वीकारण्यासाठी उपलब्ध नसेल असा त्याचा अर्थ. हे दिवे एलईडी असणार असून प्रत्येक दिव्याचा अर्थ मराठी आणि इंग्रजीतून लिहिणे बंधनकारक असणार आहे. तर तिन्हीपैकी एक दिवा पेटता ठेवणेही गरजेचे असणार आहे.

टॅक्सी, टॅक्सी असे करत दुरून येणाऱ्या टॅक्सीला थांबवावे लागण्याची वेळ मुंबईतील गर्दीच्या अनेक ठिकाणी प्रवाशांवर येते.

अनधिकृत खासगी टॅक्सी परिवहन विभागाकडून प्रोत्साहन दिले मात्र नियमाने चालणाऱ्या टॅक्सी चालकांना अडचणीत  आणले. नवे नवे नियम त्यांच्यावर लादले जात आहेत. टॅक्सीवर दिवा लावण्याची आवश्यकता नाही. - के. के. तिवारी, अध्यक्ष, भाजप रिक्षा टॅक्सी सेल

टॅग्स :टॅक्सीमुंबई