Join us  

"दुर्दैवी मृत्यूनंतर कोणाच्या लग्नाच्या पार्टीत नाचूतरी नका"; आशिष शेलारांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 5:58 AM

आरोपी मिहीर शाह याच्या घरावर बुलडोझर कधी चालणार? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावर आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे.

Worli Hit and Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शाह याला तीन दिवसांनी अटक करण्यात आली आहे. मिहीर शाह याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिहीर शाह याने भरधाव वेगात बीएमडब्लू कार चालवत ७ जुलैच्या पहाटे दुचाकीवरुन जाणाऱ्या प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा या दोघांना धडक दिली. या धडकेनंतर मिहीर शाह याने कावेरी नाखवा यांना फरफटत नेल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मिहीर शाह फरार झाला होता. आता या प्रकरणावरुन राज्यात राजकारण चांगलेच पेटलं आहे. आरोपी मिहीर शाह याच्या घरावर बुलडोझर कधी चालणार? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावर आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे.

रविवारी पहाटे मासे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या नाखवा दाम्पत्याला मिहीर शाह याने धडक दिली. या धडकेनंतर प्रदीप नाखवा दुचाकीवरुन खाली पडले. तर कावेरी नाखवा या गाडीच्या चाकाखाली आल्या. त्यानंतर आरोपी मिहीर शाह याने कावेरी नाखवा यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यामध्ये कावेरी नाखवांचा यात मृत्यू झाला. यानंर मिहीर शाह तिथून फरार झाला होता. अखेर त्याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. यानंतर आमदार आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी नाखवा कुटुंबियांची भेट घेतली.

दुसरीकडे, मिहीर शाह घटनेच्या आधी जुहू भागात असलेल्या ग्लोबल बारमध्ये गेला होता. त्यानंतर ग्लोबल बारच्या बाहेरचं बांधकाम बेकायदेशीर असल्याची माहिती समोर येताच महापालिकेने तिथलं अतिक्रमण हटवलं. यावरुन आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली.  तुम्ही कुठेही बुलडोझर चालवा. मात्र मिहीर शाह याच्या घरावर बुलडोझर कधी चालणार? हे पाहणं गरजेचं आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावर मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आदित्य ठाकरेंनी नाखवा कुटुंबातील सदस्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर किमान कोणाच्या लग्नाच्या पार्टीत नाचूतरी नका, असे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. "या अपघातात ज्या नाखवा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला, त्यांना हवी ती मदत मिळाली पाहिजे, त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, त्यामुळे पब किंवा बारवर कारवाई करा किंवा शाह कुटुंबाचे अनाधिकृत घर असेल त्यावर कारवाई करा, पण आदित्य ठाकरेंना माझी एक विनंती आहे, की नाखवा कुटुंबातील सदस्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर किमान कोणाच्या लग्नाच्या पार्टीत नाचूतरी नका. एकीकडे कुणाच्या तरी पार्टीत नाचायला जायचं आणि दुसरीकडे वरळीत पीडित कुटुंबाच्या दु:खाला फुंकर मारण्याचं नाटक करायचं, हे आदित्य ठाकरेंनी करू नये," असे आशिष शेलार म्हणाले.

टॅग्स :मुंबईआदित्य ठाकरेआशीष शेलारभाजपामुंबई पोलीस