शाळकरी मुलांचा जीवघेणा प्रवास थांबणार कधी? गेल्या वर्षी मुंबईत ६५४ वाहनांवर कारवाई; २६ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2023 09:53 AM2023-05-27T09:53:03+5:302023-05-27T09:53:13+5:30
राज्य शासनने अभ्यास करून स्कूल बस नियमावली २०११ मध्ये लागू केली आहे. स्कूल बसची स्थिती तपासणे, थांबे आणि भाडे ठरविण्याचा अधिकारही या समित्यांना आहे.
- नितीन जगताप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बसमध्ये गुराढोरासारखी कोंबलेली मुले, सीसीटीव्ही कॅमेरा नाही, मुलांची इत्यंभूत माहिती नाही, सुरक्षेसाठी लावण्यात येतात ते गज नाहीत... अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची कुठल्याच प्रकारे काळजी घेतलेली नसते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी न घेतलेल्या तब्बल ६५४ वाहनांवर मुंबईत कारवाई करण्यात आली असून तब्बल २६.५१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशा बसमधून मुले अगदी जीवावर उदार होऊन प्रवास करत असून या शाळकरी मुलांचा हा जीवघेणा प्रवास थांबणार कधी असा सवाल आता विविध सामाजिक संघटना करत आहेत.
राज्य शासनने अभ्यास करून स्कूल बस नियमावली २०११ मध्ये लागू केली आहे. स्कूल बसची स्थिती तपासणे, थांबे आणि भाडे ठरविण्याचा अधिकारही या समित्यांना आहे. मात्र, नियम म्हणून समित्या स्थापन केल्या असल्या, तरी बहुतांश ठिकाणी त्या कागदावरच आहेत. नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे.
प्रवासी संख्या किती असावी
बसच्या एकूण प्रवासी संख्येपेक्षा अधिक विद्यार्थी घेऊ नयेत असा नियम आहे. बारा वर्षांवरील विद्यार्थी असल्यास त्याला स्वतंत्र व्यक्ती म्हणून गृहीत धरावे. बसमध्ये वेग नियंत्रक असणे आवश्यक आहे. मुंबई महानगर परिसरात बसची कमाल वेग मर्यादा ताशी ४० किमी, तर इतर महानगरांमध्ये ताशी ५० किमी अशी निश्चित करण्यात आली आहे.
सुविधा काय असाव्यात?
शाळेच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा अपघात विमा काढलेला असणे आवश्यक आहे. शाळा प्रशासनावर विमा काढण्याची जबाबदारी आहे. शाळा प्रशासन विम्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या शुल्कात समाविष्ट करू शकते.
प्रत्येक बसमध्ये आवश्यक औषधे आणि साहित्यासह प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या नावांची यादी, इयत्ता, पत्ता, रक्तगट आदी तपशील, पालकांचे संपर्क क्रमांक यांची पुस्तिका प्रत्येक बसमध्ये असावी.
बस स्वच्छ, निर्जंतुक केलेली असावी. बसमध्ये एअर फ्रेशनर असावा.अग्निशमन यंत्रणा असणेही गरजेचे आहे. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असणेही आवश्यक आहे.
पोदार इंटरनॅशनलची स्कूलबस ४ तास होती बेपत्ता
गेल्यावर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेची वेळ संपल्यानंतर ४ तास उलटूनही मुलं घरी न परतल्याने पोदार इंटरनॅशनल स्कूल मधील पालक चिंतातूर झाले. तब्बल ५ तास शाळेची बस बेपत्ता असल्याची घटना सोमवारी सांताक्रूझ येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये घडली. तब्बल ४ तास आपल्या मुलांची कोणतीच माहिती नसल्याने पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे धाव घेतली. अखेर पाच तासांच्या शोध मोहिमेनंतर विद्यार्थी सुरक्षित आणि सुखरूप घरी पोहचले व पालकांच्या जीवात जीव आला.