Join us

मविआच्या जागावाटपाबाबत अंतिम निर्णय कधी होणार? ठाकरे गट किती जागा लढणार, संजय राऊतांनी दिले सूचक संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 10:11 AM

Sanjay Raut News: महाविकास आघाडीमध्ये आमचं जागावाटप अत्यंत काळजीपूर्वक आणि सूनियोजित पद्धतीने सुरू आहे. २७ तारखेला मविआमधील सर्व प्रमुख पक्ष आणि नेत्यांची भेट होणार आहे. त्या भेटीमध्ये जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यास काही आठवड्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत कुठला अंतिम निर्णय झालेला नाही. राज्यात ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतील तीन प्रमुख घटक पक्ष एकत्रित निवडणूक लढवतील, अशी शक्यता आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीही त्यांच्यासोबत येईल, असा दावा केला जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत मोठं विधान केलं आहे. २७ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते एकत्र भेटून जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच मविआमध्ये ठाकरे गट हा २३ जागा लढणार असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे. त्यामध्ये शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे. वंचित बहुजन आघाडी आहे. या सगळ्यांमध्ये काहीही करून भाजपाच्या हुकूमशाहीला पराभूत करायचं आहे याबाबत एकवाक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये आमचं जागावाटप अत्यंत काळजीपूर्वक आणि सूनियोजित पद्धतीने सुरू आहे. २७ तारखेला मविआमधील सर्व प्रमुख पक्ष आणि नेत्यांची भेट होणार आहे. त्या भेटीमध्ये जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे. दरम्यान, या जागावाटपामध्ये शिवसेवा ठाकरे गट हा २३ जागांवर लढेल, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

यावेळी राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली. भाजपाकडून ३७० पार वगैरे ज्या काही घोषणा सुरू आहेत ती लोकशाहीची थट्टा आहे. याचा अर्थ तुम्ही ३७० जागा जिंकण्यासाठी यंत्रणा आधीच ताब्यात घेतली आहे असा होतो. पण आम्ही ते होऊ देणार नाही, असा इशार राऊत यांनी दिला. 

टॅग्स :संजय राऊतमहाविकास आघाडी