Join us  

हुतात्मा स्मारकाचे टपाल तिकीट कधी येणार?; २५ वर्षांपासून लढा, प्रतिक्षा कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 6:40 AM

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली

मुंबई - मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, यासाठी हुतात्म्यांनी बलिदान दिले असतानाच दुसरीकडे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या स्मारकाचे टपाल तिकीट यावे म्हणून २५ वर्षे लढा देणारे संयुक्त महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाचे अध्यक्ष भाऊ सावंत यांच्या पदरात आजही निराशाच पडली आहे. 

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या स्मरणार्थ २१ नोव्हेंबर १९६१ रोजी हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. हुतात्मा स्मारक महाराष्ट्राची अस्मिता, संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास जागविणारे प्रेरणास्थान आहे. अशा ऐतिहासिक हुतात्मा स्मारकाचे टपाल तिकीट प्रकाशित करावे यासाठी संयुक्त महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाचे अध्यक्ष महादेव गोविंद तथा भाऊ सावंत यांनी शासनाकडे २५ वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या स्मारकाचे टपाल तिकीट प्रकाशित करा, असे पहिले पत्र नोव्हेंबर १९९९ मध्ये शासनाला देण्यात आले. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यासाठी भाऊ सावंत यांनी शासनाला माहितीही दिली हाेती . 

प्रस्ताव नाकारला शासनाने संबंधित प्रस्ताव केंद्राच्या दूरसंचार मंत्रालयाला पाठविला. मात्र, मंत्रालयाने हा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर १८ मार्च २००४ आणि २००६ साली सावंत यांनी पुन्हा याकडे लक्ष वेधले. २१ नोव्हेंबर २०२२ साली पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.